Ashtavinayak Road Issue : दौंड शहरातील अष्टविनायक मार्ग रस्त्याचे काम पुन्हा वादात! रस्ता रुंदच झाला पाहिजे या मागणीकरीता तीन जणांचे नगरपालिकेसमोर अमरण उपोषण सुरू



दौंड : (शहर प्रतिनिधी-अख्तर काझी)

अष्टविनायक मार्गाचा रस्ता दौंड शहरातून झाल्यास येथील दळणवळण वाढेल व शहरातील डबघाईला आलेली बाजारपेठ पुन्हा उभारी घेईल या उद्देशाने आमदार राहुल कुल यांनी सदरचा रस्ता शहरातूनच झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले, त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन सदर रस्ता शहरातूनच होत आहे. मात्र रस्ता रुंद की अरुंद करावयाचा या वादात सदरच्या रस्त्याचे काम सध्या वादात सापडले असल्याचे चित्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते भिमनगर या मार्गावरील रस्त्याचे काम मूळ आराखड्यामध्ये दाखविल्याप्रमाणे 11 मीटरचे न होता अरुंद मापाचे होत आहे. या रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या खाजगी जागा न काढताच रस्त्याचे काम पूर्ण केले जात आहे, याला आमचा विरोध असून कोणत्याही परिस्थितीत सदर मार्गावरील रस्ता 11 मी.चाच व्हावा अशी आमची मागणी आहे. आणि म्हणून दौंड शहरासाठी येथील नागरिकांच्या हितासाठी आम्ही अमरण उपोषण करीत आहोत असे विक्रम जयसिंगराव पवार यांनी यावेळी सांगितले. येथील संजय जाधव व श्याम सुंदर सोनोने हे दोघेही पवार यांच्याबरोबर उपोषणासाठी बसले आहेत.

आंदोलन कर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाने नगरपालिकेला या मार्गावरील अतिक्रमणे काढावीत म्हणून पत्र दिले आहे, त्याला 18 महिन्याचा कालावधी लोटला तरीदेखील नगरपालिकेने अतिक्रमणे काढलेली नाहीत. संबंधितांना फक्त नोटिसा देण्याचे काम नगरपालिकेने केले आहे. 

संबंधित अतिक्रमणे काढण्यासाठी दौंड पोलिसांना पत्र देऊन दोन महिने झाले परंतु अध्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. व अतिक्रमणे काढण्याची तसदी सुद्धा घेतलेली नाही म्हणून अमरण उपोषण करीत आहोत असे ही निवेदनात नमूद केले आहे. शहरातील शिवसेना, मनसे, काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट खेत घेत पाठिंबा दर्शविला आहे.

 या रस्त्याच्या कामाबाबत ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांनी याआधीच आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले आहे की, अष्टविनायक रस्ता अरुंद व्हावा यासाठी कधीच प्रयत्न केले नाहीत, रस्ता रुंद झाला पाहिजे परंतु या मार्गावरील ज्या व्यापाऱ्यांच्या खाजगी जागा रस्ता रुंदीकरणासाठी आपण घेत आहोत त्यांना त्यांच्या जागेचा मोबदला द्यायला नको का? वडिलोपार्जित या दुकानांमध्ये व्यापारी वर्षानुवर्ष व्यापार करीत आहेत त्यामुळे त्यांच्या जागा घेताना त्यांचाही विचार व्हायला पाहिजे, त्यांना प्रशासनाने  मोबदला देऊन त्यांच्या खाजगी जागा घ्याव्यात अशी भूमिका कटारिया यांची आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरपालिकेतील गटनेते बादशहा शेख म्हणाले की, आंदोलन कर्त्यांची रस्ता रुंदीकरणा बाबतची मागणी रास्त आहे, या मार्गावरील रस्ता रुंद होणे गरजेचेच आहे, संबंधित व्यापाऱ्यांना त्यांच्या खाजगी जागांचा मोबदला मिळाला पाहिजे असेही वाटते. सार्वजनिक बांधकाम विभागाने नगरपालिकेला सदरचे अडथळे काढण्याबाबत 18 महिन्यापूर्वीच कळविले आहे. मात्र नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी या प्रकरणांमध्ये निष्काळजीपणा दाखविला आहे. सदरचे अडथळे काढण्याचा अधिकार त्यांनाच आहे इतर नगरसेवकांना नाही.