दौंड मधील अष्टविनायक मार्गाला जोडणारे रस्ते झाले अपघाताचे ठिकाण, जोड रस्त्याचा चढ बनलाय व्यापारी, नागरिकांची डोकेदुखी

अख्तर काझी

दौंड : शहरातून जात असलेल्या अष्टविनायक मार्ग रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुख्य रस्त्याचे (काँक्रिटीकरण) काम झाले असून सध्या पदपथाचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची कामेही याआधीच पूर्ण झालेली आहेत. परंतु शहरातून गेलेला अष्टविनायक मार्ग रस्ता हा शहरातील जे रस्ते या मार्गाला जोडलेले आहेत त्यांच्या पेक्षा खूपच उंच झालेला आहे, त्यामुळे जोड रस्ता करताना झालेला रस्त्याचा चढ हा येथील नागरिक व व्यापारी यांना अडचणीचा व डोकेदुखीचा ठरत आहे. विशेषतः मुख्य बाजारपेठेतील शिवाजी चौकातील जोड रस्ता तसेच बँक ऑफ महाराष्ट्र व महावितरण कार्यालयासमोरील जोडरस्ता अपघाताचे ठिकाणच ठरत आहे.या जोड रस्त्यावरील चढ चढताना व उतारा वरून उतरताना वाहन चालकांना तर कसरतच करावी लागत आहे. महिला वाहन चालक आपल्या वाहनासह रस्त्यावर पडत आहेत इतका चढ या ठिकाणी झालेला आहे. या रस्त्यावरील चढ चढताना व्यापाऱ्यांच्या मालाची वाहतूक करणाऱ्या छोट्या टेम्पोतून माल रस्त्यावर पडल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या जोड रस्त्यावर काहीतरी उपाय योजना करून या ठिकाणचे झालेले चढ -उतार कमी करण्यात यावेत व दौंडकर नागरिक व व्यापारी वर्गाला या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी होत आहे. व्यापारी महासंघाचे रुपेश कटारिया, निरंजन ओझा, विशेष परमार,धरम लुंड, यादव माने, सुनील मधुरकर आदींनी आमच्या प्रतिनिधीची भेट घेत या ठिकाणच्या विचित्र, त्रासदायक परिस्थितीची माहिती दिली. रामराजे कापरे यांनी दौंड नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे त्यामुळे कापरे यांनीच आता दौंडकर नागरिकांचा हा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.