जालना : अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याला भांबेरी येथे पोलिसांनी अडवले. यावेळी पोलिसांनी मनोज जरांगे यांना अंबड तालुक्यात संचार बंदी लागू केली असल्याचे सांगितले. यावेळी जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सोशल मिडियावर बंदुकीचा फोटो अपलोड करणाऱ्यांनी रात्रीच याचा उपयोग करायचा ठरवले होते मात्र मराठ्यांच्या एकजुटीपुढे त्यांना ते जमले नाही असा गौप्यस्फ़ोट करत आपण पुन्हा अंतरवाली सराटी येथे जाऊन सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलकांना ताब्यात घेतल्याने बस ची जाळपोळ
जरांगे यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळताच जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी तेथे राज्य परिवहन महामंडळाची बस पेटवून देण्यात आली. मनोज जरांगे-पाटलांबरोबचे मराठा आंदोलक शैलेंद्र पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि त्यातूनच त्यांनी ही बस जाळल्याचं सांगितलं जात आहे.
पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि पोलीस बंदोबस्त
जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कुच केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने भांबेरी गावासह संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवला तर अंबड तालुक्यामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे जाण्यासाठी निघालेले हजारो मराठा आंदोलक हे जरांगे-पाटील यांच्यासोबत भांबेरी गावामध्ये मुक्कामी होते. सकाळी जरांगे आपल्या आंदोलकांसोबत मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरु करणार होते मात्र जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याने आता त्यांनी अंतरवाली सराटी येथे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
राजकीय षडयंत्र असल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप –
उद्धव ठाकरे आणि शरद पवार जी स्क्रिप्ट बोलत होते ती आता जरांगे पाटील यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. याचा अर्थ यामागे नक्कीच काहीतरी राजकीय षडयंत्र आहे. याबाबत सरकारकडे काही माहिती आहे, मात्र वेळ आल्यावर ते उघड होईल. तसेच जरांगे पाटील यांचे आरोप हे निराधार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.