पुण्यात 2 हजार कोटींच्या विकास कामांना मान्यता : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : पुणे शहरातील पूर संरक्षक भिंत, कात्रज कोंढवा-रस्त्यासाठी भूसंपादन, उड्डाणपूल, अंडरपास, ग्रेड सेपरेटर अशा २ हजार कोटींच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून पुढील तीन वर्षात या कामांसाठी शासनाचा हिस्सा देण्यात येईल आणि यावर्षापासून काम सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केले.

पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित येरवडा गोल्फ क्लब चौकातील धर्मवीर संभाजी महाराज उड्डाणपुलाच्या कोनाशिलाचे अनावरण करुन लोकार्पण तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर, येरवडा येथे दूरदृष्यप्रणालीद्वारे खडकी कटक मंडळ हद्दीतील जुना पुणे-मुंबई रस्त्याचे रुंदीकरण करुन बी.आर.टी मार्ग, बावधन बुद्रुक या गावामध्ये समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नव्याने विकसित करण्यात आलेल्या पाईप लाईन, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुनिल कांबळे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, बापूसाहेब पठारे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, मुख्य अभियंता प्रकल्प श्रीनिवास बोनाला आदी उपस्थित होते.

प्रगतीशील पुणे तयार करण्याचे काम करण्याचा प्रयत्न असल्याचे नमूद करून श्री.फडणवीस म्हणाले, राज्य शासनाचे ६० टक्के आणि ४० टक्के महानगरपालिकेने खर्च करण्याच्या योजनेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या कामांमुळे पावसाळ्यात शहरात नाल्यालगतच्या भागातील पूर परिस्थितीचा आणि सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

शहराबाहेरील रिंगरोडचे कामही वेगाने हाती घेण्यात येत आहे. या रस्त्याच्या भूसंपादनाला १० हजार कोटी रुपये लागणार असूनही या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. त्या माध्यमातून पुण्याच्या आर्थिक विकासाला मदत मिळेल. हा रिंगरोड अडीच लाख कोटी रुपयांची व्हॅल्यु तयार करेल. पुढील १० वर्षाची विकासाला दिशा देण्याचे कार्य हा मार्ग करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारीबाबत कडक धोरण
पुण्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. पुण्यात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तर देशातील इतर शहरांप्रमाणे चांगले वातावरण पुण्यात निर्माण करून माहिती तंत्राज्ञान, मॅन्युफॅक्चरींग आणि नाविन्यतेच्या क्षेत्रात चांगली प्रगती करता येईल. उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्याचा कडक संदेश देण्यात आला आहे. पुण्यात मनुष्यबळाची खाण असल्याने मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार येत आहेत. येत्या काळात मुंबईप्रमाणे पुणे हे दुसरे ‘ग्रोथ इंजिन’ तयार होईल. पुणे दुप्पट वेगाने आणि दुप्पट क्षमतेने धावावे यासाठी राज्य शासन सहकार्य करेल.

मेट्रोमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होईल
गेल्या पाच वर्षात महानगरपालिकेने विकासाची बरीच कामे केली. पुण्याचा विकास आराखडा या काळात मंजूर करून पुण्याचा विकासाचा मार्ग मोकळा केला. पुण्याच्या मेट्रोला गती देण्यात आली असून त्याचा एक टप्पा पूर्ण झाला. पुण्यात निर्माण होणाऱ्या मेट्रोच्या जाळ्यामुळे वाहतूकीची कोंडी कमी करण्याचे काम येत्या काळात होणार आहे. शिवाजीनगरच्या पुढे हिंजवडीपर्यंत मेट्रो न्यायची आहे. त्या संदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव आले आहेत. मेट्रो मार्गाचे इंटिग्रेशन झाल्यावर त्यास मान्यता दिली जाईल. पुण्यात पीएमपीएमएलच्या माध्यमातून चांगली बससेवा देण्यात येत आहे. देशात सीएनजी आणि इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या सर्वाधिक बसेस पुण्यात आहेत. शहरात एसी बसेस सुरू करताना तिकीटाचे दरही वाढविण्यात आले नाही. पुण्याचे चित्र बदलण्याचे काम या विविध माध्यमातून होत आहे.

निर्मळ नदीच्या किनाऱ्यावर वसलेले गाव ही मूळ ओळख देणार
शहरात नदी शुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. मुळा-मुठा आपली ओळख असल्याने आपली नदी अविरत वाहण्यासोबत निर्मल रहायला हवी यासाठी जायका प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. निर्मल नदीच्या किनाऱ्यावर वसलेले पुणे ही मुळ ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. चोविस तास पाण्याची योजनेचे काम वेगाने सुरू असून त्याद्वारे गळती रोखण्यासोबत शाश्वत आणि योग्यप्रकारे पाणी देण्याचे काम पुणे महानगरपालिका करेल. नदीकाठ सुशोभिकरण आणि विकासाचे कामही वेगाने सुरू आहे. त्यातून पर्यटकांकरीता आकर्षणाचे केंद्र तयार होईल. पुण्यातील एसआरएचे, पुर्नविकास, म्हाडा प्रकल्प मार्गी लावून पुण्याचा विकास घडवायचा आहे, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

पुणे शहराचा विकास करण्यासाठी शासन कटीबद्ध-पालकमंत्री..
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पुणे शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शहरातील अनेक रस्ते, वाहतूक कोंडीच्या जागी उड्डाणपुल, शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा विकास आराखडा, बावधन येथील पाणी पुरवठा आदी कामे करण्यात आली आहेत. नदी सुशोभिकरण प्रकल्पही हाती घेण्यात आला आहे. महानगरपालिकेने स्वत:चे रुग्णालय उभारणे हे स्वातंत्र्यानंतर प्रथमच घडत आहे. शहरातील २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना पुर्णत्वास येत आहे. त्यानंतर शहरातील पाण्याची गळती थांबून पाण्याची समस्या दूर होईल. जायका प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अन्य कामांसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरता येईल, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा अधिकाधिक साठा मिळू शकेल. मार्च अखेरपर्यंत मेट्रोचा ३३ किलोमीटरचा टप्पा पूर्ण होत आहे. पुढच्या टप्प्याला सुरूवात करण्याचाही प्रयत्न करण्यात येत आहे. शहराची झपाट्याने वाढ होत असून पयाभूत सुविधांचा विकास करण्यात येत असून शहराचा विकास करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात विक्रम कुमार म्हणाले, पुणे शहर देशात लोकसंख्येप्रमाणे ८ वे आणि क्षेत्रफळाच्या संदर्भात दुसरे शहर झाले आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महापालिका कटीबद्ध आहे. नूतन उड्डाणापुलामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. महापालिका क्षेत्रात समाविष्ट गावात सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराज उड्डाणपुलासाठी केलेल्या कामाबद्दल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक आणि योगश मुळीक यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, नागरिक उपस्थित होते