दौंड : दौंड च्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून दि. 26 सप्टेंबर रोजी दौंड पोलीस स्टेशनचा पदभार त्यांनी स्वीकारला आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष डोके यांची कोल्हापूर येथे बदली झाल्याने पवार यांची दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या अगोदर पवार यांनी मुंबई, सोलापूर,अक्कलकोट येथे तसेच पुणे आर्थिक गुन्हे शाखेत कर्तव्य बजाविले आहे. आज दौंड पोलीस स्टेशनची सूत्रं हाती घेताच त्यांनी स्थानिक पत्रकारांना निमंत्रित करीत त्यांच्याशी संवाद साधला. शहरात काम करीत असताना नेमक्या कोणत्या कामांवर जास्त लक्ष केंद्रित करावयास पाहिजे या संबंधीची माहिती त्यांनी पत्रकारांकडून जाणून घेतली. शहरातील वाहतूक, पार्किंग, शाळा व भाजी मंडई परिसरात महिलांना व मुलींना रोड रोमियोंकडून होणारी छेडछाड, अल्पवयीन मुलांची दुचाकीवरून ट्रिपल सीट रायडिंग आदि विषय पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी पोलीस निरीक्षक गोपाळ पवार म्हणाले की, शहरातील कायदा सुव्यवस्थेचे काम करीत असताना पोलीस प्रशासनाला पत्रकार मित्रांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना ठेवून जर सर्वांनीच सहकार्य केले तर पोलीस प्रशासन आणखीन चांगले काम करू शकेल. उदा. शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे, याचे महत्त्व समजून सर्वांनी पोलीस प्रशासनाला मदत करावी असे आवाहन पवार यांनी दौंडकरांना केले. पत्रकार मित्रांनी निदर्शनास आणून दिलेल्या समस्यांवर प्राधान्याने काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.