‛मिरज मेडिकल हब’ साठी कर्नाटक मुख्यमंत्र्यांकडे साकडे

सांगली (सुधीर गोखले) : सांगली  जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची आज भारती हॉस्पिटल संकुलामध्ये माजी राज्यमंत्री आणि भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ.डॉ. विश्वजित कदम यांच्यासह मिरज सुधार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली. 

मिरज हे आरोग्य पंढरी म्हणून स्वातंत्र्योत्तर काळापासून संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध शहर आहे कर्नाटक सह कोल्हापूर सातारा सोलापूर जिल्ह्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी इथे येत असतात डॉ विल्यम वानलेस यांनी मिरजेचे आरोग्यदृष्ट्या चांगले हवामान पाहून तत्कालीन वानलेस रुग्णालयाची (सध्याचे मिशन हॉस्पिटल) उभारणी केली परंतु सध्या या दवाखान्याची अवस्था सुद्धा खडतर बनली आहे तसेच कर्नाटक राज्याची वाजपेयीश्रीसह अन्य वैद्यकीय योजनांचा लाभ मिरज-सांगली शहरातील अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍या कर्नाटक रूग्णांना मिळत नाही.

त्यामुळे रूग्णांची फरफट आणि हॉस्पिटल प्रशासनाची मोठी अडचण होत आहे. मिरजेतील वैद्यकीय सोयी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कर्नाटक राज्याने सहकार्याची भमिका घेण्याची मागणी मिरज सुधार समितीने कर्नाटकाची मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आमदार विक्रम सावंत, निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील, सांगली शहर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.आज भारती हॉस्पिटल संकुला मध्ये सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या पुढाकाराने मिरज सुधार समितीचे ऍड . ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, कार्यवाह जहीर मुजावर, उपाध्यक्ष संतोष जेडगे, राकेश तामगावे आदी सदस्यांनी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांची भेट घेतली.

कर्नाटक राज्यातील रूग्णांसाठी वरदान लाभलेल्या वाजपेयीश्री योजनांसह अन्य वैद्यकीय योजना मिरज-सांगली शहरात प्रभावीपणे राबविण्याबाबत कर्नाटक सरकारने योग्य ते उपाय योजना कराव्यात. कर्नाटक सरकारने शक्ती योजनांतर्गत महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली आहे. मात्र, या योजनेचा लाभ कर्नाटक सीमेपर्यंत दिला जातो. वैद्यकीय उपचार, शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात कर्नाटकातील नागरिक मिरजेला येतात. म्हणून शक्ती योजना मिरजेपर्यंत वाढवावी, अशी मागणी मिरज सुधार समितीने मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.