Political
विरोधीपक्षनेते अजितदादा पवार हे अमरावतीच्या दौऱ्यावर असताना एका पत्रकाराने त्यांना शरद पवारांबाबत ‘तो’ प्रश्न विचारला आणि त्यानंतर अजितदादा चांगलेच संतापल्याचे दिसले. अजितदादांनी यावेळी पत्रकारांना सुनावताना तुम्हाला ब्रेकिंग बातमी मिळत नाही म्हणून अश्या बातम्या करता आणि लोकांच्या मनात गैरसमज पसरवता का असेही खडसावले.
जयंत पाटील यांचे निलंबन झाले त्यावेळी विरोधीपक्षाने मवाळ भूमिका घेतली त्यामुळे शरद पवारांनी याबाबत अजित दादांना फोन केला आणि नाराजी व्यक्त केली अशी काहीशी चर्चा सुरु झाली. याबाबत पत्रकाराने अजित पवारांना प्रश्न विचारल्याने ते पत्रकारावर भडकल्याचे पहायला मिळाले. यावेळी अजित पवारांनी बोलताना,
मी गेली 32 वर्षे राजकारणात आहे. मला काय दुधखुळा समजला काय, विरोधी पक्षनेता म्हणून मी कसं काम करावं हे मला कुणी सांगण्याची गरज नाही. मला विरोधी पक्षनेतेपदावर बसवलेल्या आमदारांना माझं काम माहिती आहे, त्यामुळेच तर त्यांनी मला त्या पदावर बसवलं. बरं माझ्यावर पवारसाहेब नाराज झाले, हे तुम्हाला कुणी सांगितलं, पवारसाहेबांनी तुम्हाला फोन केला होता का? असे प्रश्न त्यांनी पत्रकाराला केले.
आणि उगच काहीतरी पसरवण्याचं, बातम्या पेरण्याचं काम करु नका, अशा शब्दात अजित पवार यांनी पत्रकाराला खडसावलं. मी पवार साहेबांच्या कायम संपर्कात असतो, तुम्हाला हे पवार साहेबांनी सांगितलं का?? तुम्ही जे विचारताय त्याबाबत तुमच्या ज्ञानात ही भर कुणी टाकली, तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे म्हणून काहीही प्रश्न विचारु नका, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करु नका असेही अजित पवार यावेळी म्हणाले.