दौंड शुगर कारखान्याच्या कामगार वसाहतीमध्ये घरफोडी, 3 लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास

अख्तर काझी

दौंड : दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगर साखर कारखान्याच्या कामगार वसाहतीमधील बंद फ्लॅट फोडून चोरट्याने 3 लाख 27 हजार 600 रु.चा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी संतोष नामदेव पाचरणे (रा. दौंड शुगर कामगार वसाहत, बिल्डिंग-डी, रूम नंबर 7, आलेगाव, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार दि.17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 ते 18 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वा. च्या दरम्यान सदर घटना घडली. फिर्यादी दौंड शुगर कामगार वसाहती मध्ये राहतात, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या फ्लॅटच्या दरवाज्याचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व घरामधील असणाऱ्या लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम(रु.600) असा एकूण 3 लाख 27 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे.

तसेच फिर्यादींच्या घराशेजारील बिल्डिंगमध्ये राहणारे कामगार प्रकाश शिवाजी भापकर (सी, बिल्डिंग,रूम नं 7), नेवसे, अजय कुमार रावसाहेब काळे, शिवकांत शंकरराव काळे हे सर्व त्यांच्या गावी गेले असल्यामुळे त्यांची घरे ही बंद होती. चोरट्याने त्यांच्या घरांच्या ही दरवाज्याचा कोयंडा तोडून घरातील सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली असल्याची माहिती फिर्यादी यांनी पोलिसांना दिली आहे. परंतु त्यांच्या घरातील नेमका किती किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे याचा तपशील अद्याप मिळालेला नाही.

दौंड शुगर कारखाना परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था असताना या ठिकाणी घरफोडी झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे कारखाना परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याची माहिती समोर येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.