फसवणुकीच्या गुन्ह्यातील 5 जणांना अटकपूर्व जामीन मंजूर

केडगाव, दौंड : दौंड तालुक्यातील दापोडी या गावातील धनसिंग रघुनाथ घुले यांनी दापोडी येथील त्यांचे मेहुणे बाळासाहेब हरिभाऊ वाघमोडे तसेच भाऊ भारत रघुनाथ घुले, लक्ष्मण उत्तमराव थोरात, बहीण संगीता व भावजय सुनीता भारत घुले यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून यवत पोलिसांनी वरील सर्व आरोपिंविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

यावेळी बारामती येथील फौजदारीचे प्रसिद्ध वकील ॲड.राजेंद्र काळे यांनी वरील आरोपींच्यावतीने बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. सदर अर्जामध्ये आरोपींच्या वतीने ॲड.राजेंद्र काळे यांनी जोरदार युक्तिवाद करत आरोपिंना अटकपूर्व जामीन देण्यात यावा अशी मागणी केली होती तर या घटनेतील मूळ फिर्यादी धनसिंग रघुनाथ घुले यांनीही स्वतः त्यांचे वकील ॲड. अमोल आटोळे यांच्यामार्फत प्रतिज्ञापत्र सादर करून सदरचा गुन्हा हा गैरसमजातून दाखल झाला असून त्यामध्ये आरोपींविरुद्ध काही एक तक्रार नाही असे नमूद केले व स्वतः मे.कोर्टात हजर राहून तसे त्यांनी कबूल केले अशी माहिती आरोपिंचे वकील काळे यांनी दिली आहे. त्यामुळे मे. कोर्टाने सर्व आरोपींना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

घडलेल्या घटनेची दापोडी परिसरामध्ये खूप मोठी चर्चा सुरु होती परंतु फिर्यादी यांनी सदरचा गुन्हा गैरसमजातून दाखल झालेला असल्यामुळे व सर्व आरोपींना अंतरिम जामीन मंजूर झाल्यामुळे या घटनेतील आरोपींना आता मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.