शेतकरी मित्रांना ‘पी.एम.किसान’ योजनेचा लाभ मिळण्यासाठी पुन्हा एक संधी, ‘ही’ आहे शेवटची तारीख

पुणे : राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीनुसार जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी समावेश करण्यासाठी १५ जानेवारी २०२४ पर्यंत गावपातळीवर विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) रुपये २ हजार प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रूपये ६ हजार लाभ अदा करण्यात येत आहे. लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे ईकेवायसी केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.

या मोहिमेमध्ये लाभार्थींची स्वयं नोंदणी व ई-केवायसी साठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे. विशेष मोहिमेमध्ये ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी लाभार्थींची योजनेतील सद्यस्थिती तपासणे व ईकेवायसी करणे, पोर्टलवर नोंदणी करतांना जमीनीचा तपशिल भरणे, फेस ऑथेंटिकेशन ॲपचा वापर करून ई-केवायसी करणे यासाठी शेतकऱ्यांना मदत करतील. तसेच लाभार्थींची बँक खाती आधार संलग्न केली असल्याची खातरजमा करतील.

गावातील योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थीचा शोध घेऊन योजनेच्या निकषांनुसार तपासणी अंती पात्र असलेल्या लाभार्थींना पी एम किसान योजनेच्या लाभासाठी समाविष्ट करण्यात येईल. विशेष मोहिमे अंतर्गत योजनेच्या लाभासाठी समाविष्ट करावयाच्या पात्र लाभार्थींसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजनही करण्यात येणार आहे.

पी. एम. किसान योजनेचा १६ व्या हप्त्याचा लाभ येत्या जानेवारी महिन्याच्या शेवटी वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता शेतकऱ्यांनी स्वत: करावयाची आहे. यासाठी पी. एम. किसान योजनेच्या या ४५ दिवसांच्या मोहिमेमध्ये योजनेच्या निकषांच्या अधिन राहून पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी.

अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक,मंडळ कृषी अधिकारी,तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. महसूल, ग्रामविकास व कृषी या विभागांनी सर्व समन्वयाने राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पी. एम. किसान योजनेत समाविष्ट करण्यासाठी या विशेष मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करावी, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी केले आहे.