केडगावातील मुस्लिमांच्या हाती पुन्हा निराशा ! ‘त्या’ आणि ‘आज’ च्या निवडणुकीत ‘हा’ फरक, ‘कापरे’ यांनी त्यावेळी वेगळी चूल मांडण्याचे कोडे कोणालाच उलगडले नाही

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव ही एक महत्वाची समजली जाणारी ग्रामपंचायत आहे. आज हाती आलेल्या निकालामध्ये अनेक धक्कादायक असे निकाल लागले आहेत. आजचा निकाल हा थोरात आणि कुल गटाला धक्का देणारा ठरला असून येथे बाळासो कापरे यांच्या केडगाव विकास आघाडीचे सरपंच निवडून आले आहेत. केडगाव विकास आघाडीने या निवडणुकीत केडगाव स्टेशन येथून तीन उमेदवार उभे केले होते त्यामध्ये एक मुस्लिम महिला उमेदवाराचाही समावेश होता. मात्र यावेळीही 2008 प्रमाणे मुस्लिम उमेदवाराला पराभव पत्कारावा लागला तर पॅनलचे अन्य दोन उमेदवार निवडून आले आहेत.

2008 आणि 2023 च्या निवडणुकीतील हा आहे फरक..
2008 साली झालेल्या केडगाव ग्रामपंचायत निवडणुकीवेळी विद्यमान आमदार व त्यावेळचे भीमा पाटसचे चेअरमन राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली बनलेल्या अधिकृत पॅनलमध्ये मनोज होळकर (भोसले), अतुल पवार यांसह सायरा अत्तार या मुस्लिम महिला उमेदवार निवडणुकीला सामोरे गेल्या होत्या. मात्र त्यावेळी या पॅनलमधील मनोज होळकर (भोसले), अतुल पवार आणि सायरा अत्तार हे तीनही उमेदवार थोड्याफार फरकाने पराभूत झाले होते. यावेळी केडगाव स्टेशन वार्डमधून बाळासो कापरे यांच्या विकास आघाडी पॅनल ने संदीप राऊत, शैलजा पितळे यांसह मुस्लिम महिला उमेदवार जबीन शिकिलकर यांना उमेदवारी देण्याचे धाडस केले. मात्र यावेळी तीन उमेदवारांपैकी दोन उमेदवार निवडून आले तर मुस्लिम उमेदवार यांना अनपेक्षित पराभव पत्कारावा लागला. 2008 साली संपूर्ण पॅनल पडला होता तर यावेळी मात्र मुस्लिम उमेदवार पडण्याचे कारण नोटा बटन असल्याचे उत्तर बाळासो कापरे यांच्याकडून सांगितले जात आहे.

दहा वर्षे सत्ता असणाऱ्या जनसेवा ग्रामविकास पॅनलची सत्ता संपुष्टात केडगाव ग्रामपंचायतवर सलग दहावर्षे सत्ता असणाऱ्या जनसेवा पॅनलची सत्ता यावेळी संपुष्टात आली आहे. पाच वर्षात सत्ताधारी गटाकडून अनेक कामे प्रलंबित राहिली अथवा ठेवली गेली असा आरोप थोरात गट आणि कापरे गटाकडून निवडणूक प्रचारात करण्यात येत होता. याचा परिणाम म्हणून मतदारांनी सत्ता बदल करण्याकडे केल्याचे बोलले जात आहे.

थोरात यांच्या हस्ते केक कापला मात्र ऐनवेळी बाळासो कापरे यांनी वेगळी चूल मांडली

निवडणूक जाहीर झाल्यानंतर केडगावमध्ये अनेक घडामोडी घडल्याचे पहायला मिळाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर बाळासो कापरे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाला माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा वैशाली नागवडे यांसह थोरात गट मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी बाळासो कापरे आणि माजी आमदार रमेश थोरात यांनी ‘सहकारनामा’ वृत्तपत्राच्या कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी मोठ्या आनंदात उभायंतांमध्ये या ठिकाणी चहापानाचा कार्यक्रम पार पडला होता.

मात्र त्यानंतर अचानक कुठे माशी शिंकली हे कोणालाच समजले नाही आणि अचानक काही दिवसांत बाळासो कापरे यांनी आपला स्वतंत्र पॅनल उभा करून थोरात गटाला मोठा धक्का दिला. त्यांच्या अचानक पॅनल उभे करण्यामुळे थोरात गटाला केडगाव स्टेशन, धुमळीचा मळा येथे पॅनल उभा करता आला नाही.