अब्बास शेख
दौंड : बारामती लोकसभा निवडणुकीसाठी आता ओबीसी पर्व ने प्रस्थापितांविरोधात एल्गार पुकारला आहे. एकाच तालुक्याचा विकास अण बाकी तालुके भकास असा वर्षानुवर्षे एक कलमी कार्यक्रम राबविणाऱ्या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे. त्यामुळे आता बारामती लोकसभा निवडणुकीसाठी ओबीसी पर्वचे महेश भागवत यांच्या नावाची घोषणा करण्यात येत असल्याचे चौफुला येथे पत्रकारांना देण्यात आलेल्या माहितीमध्ये जाहीर करण्यात आले. यावेळी ओबीसी पर्व मधील माळी, धनगर समाजाचे काही महत्वाचे नेते उपस्थित होते. लवकरच पत्रकार परिषद घेऊन याबाबत विस्तृत माहिती देण्यात येणार असल्याचे यावेळी महेश भागवत यांनी म्हटले आहे.
कोण आहेत महेश भागवत !
महेश भागवत यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील सिताराम भागवत हे १९७१ ते १९८७ साली जिल्हा परिषदेचे सदस्य होते, १९७८ ते १९८३ साली ते पिडीसीसी बँकेचे चेअरमन होते, तसेच त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक आणि भिमा पाटस चे संस्थापक संचालक म्हणून महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून महेश भागवत हे 1989 सालापासून राजकारणात सक्रिय झाले. १९८९ साली महेश भागवत हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. राष्ट्रीय पातळीवरील पक्षाचे त्यांनी प्रदेश कार्यकारिणीचे काम पाहिले. शिक्षण, दूधसंस्था यामध्ये त्यांनी महत्वाची पदे भूषवली असून त्यांनी कायद्याची डिग्री घेतली आहे. मुळशी धरणाचे पाणी शेती आणि पिण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ग्रामिण भागात वळवणे आणि धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून ते शेतकऱ्यांना देण्यासाठी जलवाहिनी संकल्पना त्यांनी सर्वात अगोदर मांडली होती. सहकार क्षेत्रात त्यांचा तगडा अनुभव असून गेल्या अनेक वर्षांपासून ते क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विविध स्पर्धा आयोजित करत आले आहेत.
या पक्षांकडून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न सुरु
धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांच्या बहुजन समाज मोर्चा आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी ओबीसी पर्व कडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र जरी कोणत्याही पक्षाची उमेदवारी मिळावी नाही तरी ते अपक्ष उभे राहणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.
बारामती लोकसभेचे निवडून आलेले खासदार आणि त्यांचा कार्यकाळ
• पहिली लोकसभा १९५२-५७
• दुसरी १९५७-६२ केशवराव मारूतीराव जेधे (काँग्रेस)
• १९६२-६७ जी.के. जेधे (काँग्रेस)
• १९६७-७१ तुलसीदास जाधव (काँग्रेस)
• १९७१-७७ आर.के. खाडीळकर (काँग्रेस)
• १९७७-८० संभाजीराव एस. काकडे (जनता पक्ष)
• १९८०-८४ शंकरराव पाटील (काँग्रेस आय)
• १९८४-८९ शरदचंद्र गोविंदराव पवार (काँग्रेस एस), साहेबराव के.एस. (जनता पक्ष)
• १९८९-९१ शंकरराव पाटील (काँग्रेस आय)
• १९९१-९६ अजित पवार, शरदचंद्र गोविंदराव पवार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
• १९९६-९८ शरदचंद्र गोविंदराव पवार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
• १९९९-२००४ शरदचंद्र गोविंदराव पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
• २००४-२००९ शरदचंद्र गोविंदराव पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
• २००९-२०१४सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
• २०१४-२०१९ सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
• २०१९- आत्तापर्यंत सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)