Anna bhau sathe – दौंड मध्ये साहित्यरत्न- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी, पक्ष, संघटनांच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे आयोजन



|सहकारनामा|

दौंड : मी एकटा नाही, युगा युगाची साथ आहे… सावध असा तुफानाची सुरुवात आहे… 

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 101 वी जयंती दौंडमध्ये अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. येथील अण्णाभाऊ साठे नगर, सिद्धार्थ नगर, भीम नगर परिसरामध्ये विविध पक्ष, संघटनांनी सामाजिक उपक्रम राबवित अण्णाभाऊ साठे जयंती साजरी केली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृति संस्थेच्या वतीने येथील अण्णा भाऊ साठे उद्यानामध्ये जयंतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या महान कार्याचा आढावा घेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. जयंती निमित्ताने डॉ. भीमराव मोरे यांच्या पुढाकाराने मान्यवरांच्या हस्ते  संविधान प्रास्ताविकाच्या प्रति चे यावेळी वाटप करण्यात आले. मा. आमदार रमेश थोरात, नगराध्यक्ष शितल कटारिया, नायब तहसीलदार सचिन आखाडे, पोलीस निरीक्षक नारायण पवार तसेच विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृति संस्थेचे पदाधिकारी आबासो. वाघमारे यांनी आपल्या प्रास्ताविका मध्ये  उद्यानाच्या झालेल्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकला. ते पुढे म्हणाले की, या उद्यानामध्ये येण्यासाठी लहान मुलांना, महिलांना, वृद्धांना सुरक्षित असा रस्ता सुद्धा नाही, उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर झालेला रस्ता पूर्णपणे चुकीचा व उद्यानामध्ये येणाऱ्यांसाठी अतिशय धोकादायक असा आहे. या परिस्थिती बाबत आम्ही नगरपालिकेला, सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार कळवून ही अद्याप कोणतीही कार्यवाही केली जात नाही. सार्वजनिक बांधकाम खाते व नगरपालिका या दोघांनीही मान्य केले आहे की हा रस्ता योग्य पद्धतीने करण्यात आलेला नाही, काम संपूर्णपणे चुकीचे केलेले आहे हेसुद्धा त्यांनी मान्य केले आहे. सगळी खाती म्हणतात रस्ता पलीकडे गेला पाहिजे, उद्यानासमोर जागा उपलब्ध झाली पाहिजे मात्र उद्यानाला न्याय  कोणी देत नाही ही शोकांतिका आहे. जयंती निमित्ताने आमची एकच मागणी आहे की, हे आपले सर्वांचे उद्यान आहे असे समजून, उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता 10 फूट पलीकडे करावा. उद्यानाला न्याय दिला गेला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही आबासो वाघमारे यांनी यावेळी दिला.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यानामध्ये नगरपालिकेने अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली होती, जयंती निमित्ताने याविषयी बोलताना नगराध्यक्ष शितल कटारिया म्हणाल्या की, नगरपालिकेने व सर्व नगरसेवकांनी या उद्यानामध्ये अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यासाठी चा निर्णय घेतलेला आहे. उद्यानामध्ये आम्ही अण्णा भाऊंचा पुतळा बसविणार आहोत, फक्त सर्वांना विनंती आहे की या कामामध्ये कोणीही राजकारण आणू नये.

अण्णा भाऊ साठे उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा परिषद सदस्य वीर धवल जगदाळे व ज्येष्ठ नगरसेवक बादशहा शेख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 27 लाख रुपयांचा निधी आणलेला आहे, आयोजकांच्या वतीने या दोघांचे तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी मोठी आर्थिक देणगी देणारे रवींद्र कांबळे यांचे यावेळी आभार मानण्यात आले.