सांगली (सुधीर गोखले) : आज पालकमंत्री नामदार डॉ.सुरेश खाडे ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले आणि चक्क त्यांनी रेल्वेचे गेटच नागरिकांसाठी खुले केले.
सविस्तर हकीकत अशी सांगली मिरज या महामार्गावर कृपामाई रुग्णालय समोर समतानगर नागरी वस्तीचा भाग आहे याच ठिकाणी शासकीय गोदाम आहे त्यामुळे रेल्वे चा ट्रॅक या ठिकाणी आहे आणि समतानगर पासून मिरज शहराला जोडणारा एकमेव हा रस्ता आहे यामध्ये रेल्वे गेट येत असल्याने बऱ्याच वर्षापासून रेल्वे वाहतूक असताना गेट बंद करावे लागते त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. काही दिवसापूर्वी तर रेल्वे प्रशासनाने चक्क हे गेटच कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय अचानक घेतला आणि समता नगर भागातील नागरिकांचा मिरज शहराशी असलेला संपर्क तोडण्याचा प्रयत्न झाला तशी नोटीसही या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने लावली.
परंतु या प्रभागाच्या नगरसेविका व माजी महापौर संगीता खोत या तेथील नागरिकांसह या गेट बंदला विरोध केला होता. काही दिवसापूर्वी नगरसेविका संगीता खोत यांनी याबाबत मिरज तहसीलदार अपर्णा धुमाळ यांना निवेदनही दिले होते. त्याप्रमाणे मिरज तहसीलदार यांनी या जागेची पाहणी केली होती. आज अचानक पालकमंत्री ना.खाडे यांनी नागरिकांसह हे गेटच खुले केले. त्यामुळे येथील नागरिकांनी एकच जल्लोष केला.
यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रा. मोहन वनखंडे माजी महापौर व नगरसेविका संगीता खोत युवा नेते सुशांत खाडे भाजप मिरज शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि तेथील नागरिक जमले होते. हे गेट बंद होऊ नये यासाठी येथील नागरिकांनी नांदर खाडे यांना निवेदन दिले आहे. आज पालकमंत्री ॲक्शन मोड मध्ये आल्याने नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे त्याचप्रमाणे या रस्त्यावरची वाहतूक देखील भविष्यात सुरळीत राहावी अशा भावना येथील नागरिकांमधून पहायला मिळाल्या.