..आणि ‘मुख्यमंत्री’ साहेबांचा ताफा लोणीकाळभोरच्या ‘कदमवाकवस्तीत’ थांबला

लोणीकाळभोर : आषाडी एकादशीच्या विठ्ठलाच्या आरतीसाठी पंढरपूरला निघालेला नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ताफा पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत जवळ येऊन क्षणभर थांबला.मुख्यमंत्र्यांनी गाडीतून बाहेर येऊन स्वागतासाठी थांबलेल्या उपस्थित शिवसैनिक व कदमवाकवस्ती लोणी काळभोर ग्रामस्थांना नमस्कार करून सत्कार स्वीकारून पुन्हा पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले.

शनिवारी (दि.९)रात्री साडेनऊच्या दरम्यान हडपसरहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गाड्यांचा ताफा पंढरपूरच्या दिशेने निघाला. मुख्यमंत्री प्रोटोकॉलनुसार त्यांचा ताफा कदमवाकवस्ती येथे थांबणार नव्हता परंतु शिवसैनिक निलेश काळभोर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या पुणे जिल्ह्यातील नावाजलेल्या मोठ्या गावात क्षणभर थांबून सत्कार स्वीकारावा अश्या मागणीचे निवेदन दिले होते व त्या संदर्भात पाठपुरावा करून मागणी केली होती.त्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री थांबल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी कदमवाकवस्ती व लोणी काळभोर येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याने पूर्व हवेलीत देखील ठाकरे गट व शिंदे गट तय्यार झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये यामुळे काहीतरी अनोखे पाहायला मिळणार अशी चर्चा नागरिकांमध्ये ऐकू येऊ लागली आहे.