सुधीर गोखले
सांगली : नुकतीच भारताची चांद्रयान ३ हि महत्वाकांक्षी मोहीम यशस्वीरित्या चंद्राजवळ जाऊन पोचली आहे. या मोहिमेमध्ये सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि इस्रो (ISRO) या अंतराळ संशोधन संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. राजन कुराडे यांनी मोलाचा वाटा उचलला होता.
स्वातंत्र्यदिनी त्यांनी प्रत्यक्षरीत्या आपल्या शाळेला भेट दिली. मिरजेतील विद्यामंदिर शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले होते. स्वातंत्र दिनानिमित्त डॉ. राजन कुराडे यांच्या हस्ते ध्वजा रोहण झाले यावेळी डॉ. कुराडे यांनी अत्यंत भावनिक मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले,’हि शाळा म्हणजे एक उपक्रमशील विद्यालय आहे. या शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा सध्या यशाची शिखरे पादाक्रांत करत आहे. या शाळेतील संस्कारानी आम्ही घडलो वाढलो आहोत. या शाळेने आम्हाला सर्वकाही दिलंय. आज मी इस्रो (isro) सारख्या संस्थेमध्ये कार्यरत आहे ते या शाळेतील तत्कालीन शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांमुळे. आज शाळेतील रोबोटिक या अभ्यासक्रमाचे उदघाटन माझ्या हस्ते होतंय हि माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक राजीव कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक शरद पिसाळ यांनी तर उपस्थितांचे आभार विजय ताम्हनकर यांनी मानले.यावेळी मिरज विद्या समितीचे संचालक कल्लाप्पा लठ्ठे, हणमंत बुवा ग्रामोपाध्ये,प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ. समेधा देशपांडे,प्रशालेचे निवृत्त शिक्षक मोहन व्हनखंडे, विद्यामंदिर प्रशालेचे पर्यवेक्षक मारुती नाळे तसेच डॉ राजन कुराडे यांचे कुटुंबीय सर्व मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक उपस्थित होते.