नवी दिल्ली : अबुधाबी येथे आयआयटी दिल्लीचे पहिले संकुल स्थापन करण्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि अबुधाबीचा शिक्षण आणि ज्ञान विभाग(ADEK) यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.
यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अडेकचे अंडर सेक्रेटरी मुबारक हमद अल मेहिरी आणि यूएईमधील भारतीय राजदूत सुंजय सुधीर आणि आयआयटी दिल्लीचे संचालक प्रोफेसर रंगन बॅनर्जी यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
सध्या सुरू असलेल्या यूएई-भारत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराला (CEPA) बळ देणाऱ्या या सामंजस्य करारातून दोन्ही देशांमधील शिक्षणाच्या उत्कृष्टतेला, नवोन्मेष, ज्ञानाची देवाणघेवाण आणि भावी समृद्धी तसेच दीर्घकालीन आर्थिक वृद्धी आणि शाश्वत विकासाचे कारक म्हणून मानवी भांडवलातील गुंतवणूक यांना प्राधान्य देण्याचा दृष्टीकोन प्रतिबिंबित होत आहे.
या करारावर स्वाक्षऱ्या झाल्याबद्दल समाजमाध्यमांवरून आपला आनंद व्यक्त करताना केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की अबुधाबीमध्ये आयआयटी दिल्लीचे पहिले संकुल उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य करारामुळे भारताच्या शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. नवभारताचा नवोन्मेष आणि प्रावीण्य यांचा दाखला देणारे आयआयटी दिल्लीचे यूएईमधील संकुल हे भारत-यूएई मैत्रीचा आस असेल.
अबुधाबीमधील आयआयटी दिल्लीचे संकुल परस्परांची समृद्धी आणि जागतिक कल्याण या दोहोंसाठी ज्ञानाच्या सामर्थ्याचा लाभ देणारी एक पूर्णपणे नवी ओळख प्रस्थापित करेल, असे त्यांनी सांगितले. यामुळे भारताच्या शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा एक नवा अध्याय देखील सुरू होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आयआयटी दिल्ली- अबुधाबी ही संस्था मोहम्मद बिन झायेद युनिवर्सिटी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, खलिफा युनिर्वसिटी, न्यूयॉर्क युनिवर्सिटी अबुधाबी, टेक्नॉलॉजी इनोवेशन इन्स्टिट्युट आणि हब 71 यांसारख्या प्रमुख संस्थांच्या सहकार्याच्या माध्यमातून पूरक कार्यक्रम उपलब्ध करून, अत्याधुनिक संशोधन सुविधा उपलब्ध करून आणि स्थानिक स्टार्टअप प्रणालीची प्रगती करून अबुधाबीमधील शैक्षणिक, संशोधनविषयक आणि नवोन्मेष परिसंस्था बळकट करेल.
आयआयटी दिल्ली-अबुधाबी संकुल 2024 पासून आपले शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करेल आणि पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी कार्यक्रम राबवेल तसेच शाश्वत ऊर्जा आणि हवामान अभ्यास तसेच कंप्युटिंग आणि डेटा सायन्स यांच्याशी संबंधित संशोधन केंद्र सुरू करेल, अशी अपेक्षा आहे. आयआयटी दिल्ली-अबुधाबी कडून ऊर्जा आणि शाश्वतता, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी, गणित आणि कंप्युटिंग आणि अभियांत्रिकी, विज्ञान आणि मानव्य या विषयांचे इतर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातील, अशी अपेक्षा आहे.