देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, बेरोजगारीने कळस गाठला अण यांना लव जिहाद आठवतोय – खासदार सुप्रिया सुळे

अख्तर काझी

दौंड : देशाच्या रुपयाची मोठ्या प्रमाणावर घसरण होत आहे, देशात बेरोजगारांचा विषय गंभीर बनत चालला आहे, देशातील, राज्यातील युवक नोकऱ्यांसाठी रस्त्यांवर रांगा लावत आहेत अशा अनेक समस्यांनी देश त्रस्त असताना सध्याचे सरकार लव जिहाद सारख्या विषयात अधिक रस घेत आहे अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

या देशांमध्ये कोणी कोणावर प्रेम करायचे, कोणाशी लग्न करायचे याचे स्वातंत्र्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने प्रत्येकाला दिलेले आहे. देशात अनेक गंभीर विषय समोर असताना सरकार लव जिहाद सारख्या विषयाला महत्त्व देत असल्याचेही खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढे बोलताना सांगितले. पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दौंड शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश (25 विद्यार्थी, प्रत्येकी 25 हजार रुपये) देण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यातील विधानसभा निवडणुक निकालाचा अंदाज( सर्वे) वेगळाच दाखविला जात होता, राज्यातील माहोल सुद्धा वेगळाच दिसत होता. आणि निकाल मात्र भलताच लागलेला पाहायला मिळाला. निवडणुकीत विजय पराजय होत असतात, परंतु महाविकास आघाडीचे जे पानिपत झाले ते आश्चर्यकारक व संशयास्पद आहे. सरकारी यंत्रणा त्यांनी वापरली, मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ करण्यात आल्याचा दाट संशय येत आहे. भाजपा महायुतीने राज्यातील निवडणूक जिंकण्यासाठी योजना जाहीर केल्या, प्रत्येक घरात पैसे गेले, याचा फायदा त्यांना झाला. परंतु विजय मिळवून देणाऱ्या त्याच योजना आता बंद करण्याचा घाट सरकार घालत आहे.

राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, खून ,दरोडे, अपहरण, कौटुंबिक हिंसाचाराने कळस गाठला आहे. सरकारचे पोलीस प्रशासनावर नियंत्रण राहिलेले नाही त्यामुळे राज्यात गुन्हेगारी वाढत आहे. दाओस मधील उद्योजकांच्या गुंतवणुकीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्या शेजारी राहणारे उद्योजक करार करण्यासाठी दाओस ला गेले होते. ते चालत मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले असते तर लवकर पोहोचले असते अशी उपहासात्मक टीका त्यांनी सरकार व उद्योजकांवर केली.

दौंड शहरातील विकास कामांबाबत त्या म्हणाल्या की, दौंड शहराची श्वेतपत्रिका काढावयाची मागणी आम्ही केली आहे, शहरात कोट्यावधी रुपयांचा निधी येऊन सुद्धा कामे झालेली दिसत नाही अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.


दौंड रेल्वे संदर्भातील.. दौंड इलेक्ट्रिक लोकोशेड (इंजिन मेन्टेनन्स) चे काम पूर्ण झालेले आहे, या लोको शेड मध्ये जवळपास 3 हजार कर्मचारी काम करणार आहेत, लोकोशेड चालू झाल्यानंतर त्याचा येथील व्यापारपेठेवर चांगला परिणाम होणार आहे, त्यामुळे हे लोको शेड नेमके कधी चालू होणार याबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, लवकरच रेल्वे व्यवस्थापकांबरोबर बैठक आहे, लवकरात लवकर लोकोशेड चालू करावे अशी मागणी मी करणार आहे.
माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, सोहेल खान, इस्माईल शेख, सचिन गायकवाड, रामभाऊ टुले, योगिनी दिवेकर, अनिल सोनवणे आनंद पळसे आदि उपस्थित होते.