ससून रुग्णालयातील ड्रग्स अमली पदार्थ प्रकरणी चौकशी समिती गठित – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथून आरोपी ललित पाटील हा फरार झाल्यानंतर येथील अमली पदार्थ तस्करीबाबत विविध घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे येथील अमली पदार्थ प्रकरण व त्यासंबंधित घटनेबाबत सविस्तर चौकशी करण्याकरिता चौकशी समिती गठित करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील अमली पदार्थ प्रकरण चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर हे अध्यक्ष असून सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. हेमंत गोडबोले, मुंबई ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. एकनाथ पवार हे सदस्य म्हणून काम पाहतील. या समितीने सखोल चौकशी करून आपला सविस्तर अहवाल १५ दिवसांत शासनास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही

ससून रुग्णालयात येरवडा कारगृहातील अनेक कैदी उपचारासाठी येतात. परंतु उपचाराच्या नावाखाली या रुग्णालयात अमली पदार्थांचे रॅकेट चालवले जात असल्याची घटना समोर आली. रुग्णालयात राहून अमली पदार्थाचे रॅकेट चालवणारा फरार आरोपी ललित पाटील हा येथून फरार झाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. चार दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत दोन कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले. त्यानंतर ललित पाटील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. त्यामुळे पुणे पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली होती. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता समिती गठीत करण्यात आली आहे.