खासदार संजय राऊत यांचे दौंडमध्ये पुतळे जाळले, केश मुंडण करून निषेध

दौंड : खासदार संजय राऊत यांनी आमदार राहुल कूल यांच्यासह संचालक मंडळावर भीमा सहकारी साखर कारखान्यात पाचशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केल्यानंतर खा.संजय राऊत यांच्या विरोधात कूल समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. कूल समर्थकांनी राहू, पाटस या ठिकाणी खा.संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले आहे तर राजेगाव येथे केश मुंडण करून राऊतांचा निषेध केला आहे.

दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याबाबत खासदार संजय राऊत यांनी कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळावर काल ५०० कोटीच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर कूल समर्थक, कार्यकर्ते हे सोशल मीडियावर राऊत यांचा निषेध करताना दिसत होते. मात्र आज मंगळवार दि. 14 रोजी तालुक्यात विविध ठिकाणी कूल समर्थक एकत्र आले आणि त्यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात निदर्शने करण्यास सुरुवात केली. यावेळी राहू आणि पाटस येथे खा.संजय राऊत यांचे प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले तर राजेगाव येथे राऊत यांचा निषेध करून कार्यकर्त्यांनी डोक्याचे केस मुंडन करत आपला निषेध नोंदवला.

खासदार संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर माजी आमदार रमेश थोरात आणि भाजप चे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनीही भीमा पाटस कारखान्याबाबत कारखान्याचे चेअरमन आणि आमदार राहुल कूल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र हे सर्व आरोप आमदार राहुल कूल यांनी फेटाळून लावले असून केवळ राजकीय आकसातून आपल्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात येत असल्याचे आ.कूल यांनी म्हटले आहेत.