मुंबई : भिमा – पाटस साखर कारखान्यावर खासदार संजय राऊत यांनी केलेला आरोप हा राजकीय आकसातून केला असल्याचे आमदार राहुल कुल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकात आमदार राहुल कुल म्हणाले की, मी 22 वर्षांपासून कारखान्याचा चेअरमन आहे. माझी हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरच हा आरोप का झाला ? असा सवाल उपस्थित केला आहे. खासदार राऊत यांना कारखान्याबाबत पूर्ण माहिती नाही अपुऱ्या माहितीच्या आधारे त्यांनी कारखान्यावर आरोप केलेले आहेत. भीमा पाटस कारखाना सुरू ठेवण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळे प्रयत्न करीत असताना वेळ आल्यावर माझी वैयक्तिक मालमत्ता ही बँकांकडे गहाण ठेवून पैसे उपलब्ध करून कारखाना चालवला आहे. ही वस्तुस्थिती असताना केवळ राजकीय आकस मनात ठेवून खासदार राऊत हे आरोप करीत आहेत असेही आमदार कुल यांनी सांगितले.
गेल्या तीन वर्षांपासून भीमा पाटस कारखाना बंद होता. त्यावेळी विरोधकांना त्याचे राजकारण करता येत होते. आता कारखाना सुरु झाला आहे. त्याचे गाळप मोठ्या प्रमाणावर होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव दिला जात आहे. त्यामुळे काहींना आता हे सर्व व्यवस्थित सुरु असलेले पाहवत नाही. त्यामुळे ते अकसातून आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.