दौंड : देशातील दहशतवादी कृत्यांसाठी पैसे पुरविल्याच्या संशयावरून केंद्रीय व राज्याच्या तपास यंत्रणांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे अटक सत्र सुरू केले आहे. या संघटनेतील पुण्यातील काही सदस्यांनाही अटक करण्यात आली. याचा निषेध म्हणून या संघटनेने पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध मोर्चा काढला, त्यावेळी आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या असा संशय व्यक्त केला जात असून त्यामुळे देशभर या संघटनेचा निषेध करण्यात येत आहे.
याच मुद्द्यावरून दौंड मध्येही सर्व पक्ष, संघटनांच्यावतीने पी. एफ. आय. या संघटनेच्या देश विघातक कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी संतप्त आंदोलकांनी पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज जाळून आपला राग व्यक्त केला व पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. पी. एफ. आय.च्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निषेधाचे निवेदन दौंड पोलिसांना देण्यात आले. निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, पी. एफ. आय संघटनेने देश विघातक कृत्य केल्याने भारतीय तपास यंत्रणेने या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली, त्यामुळे काही समर्थकांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या आहेत. समस्त भारतीयांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत लज्जास्पद आहे. या घटनेचा भारतीय नागरिक म्हणून आम्ही सर्वजण निषेध करीत आहोत. केंद्र सरकारने पी. एफ. आय या संघटनेवर बंदी घालावी तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी ही निवेदनातून करण्यात आली आहे.
आंदोलनामध्ये प्रवीण परदेशी, नंदू पवार, निखिल स्वामी, आनंद पळसे, सागर पाटसकर, सचिन कुलथे, संदीप बोराडे ,अमोल सोनवणे, सागर उबाळे, सचिन गायकवाड, हरेश ओझा ,चांद शेख, रोहित पाटील, अजय राऊत ,अमोल जगताप, तालीब शेख, आरिफ शेख, नवनाथ सोनोने, श्यामसुंदर सोनोने, जयंती पोकार, बहुसंख्येने कार्यकर्ते सहभागी होते.