Akshay Bhalerao Murder Issue | अक्षय भालेराव हत्या प्रकरणी दौंड मध्ये निषेध, मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

दौंड : अक्षय भालेराव (बोंडार हवेली ,नांदेड) या युवकाने गावामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मिरवणूक काढल्याच्या द्वेषानेच काही समाजकंटकांनी हत्या केली आहे असा आरोप करीत दौंड मधील सर्व दलित संघटनांच्या वतीने माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.

अक्षय ची हत्या करणाऱ्या सर्व नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली. पोलीस प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, अक्षय भालेराव ची हत्या करणे तसेच लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील गिरधारी तपघाले यांनी खाजगी सावकाराचे कर्ज फेड केले असताना त्यांचीही निर्घृण हत्या करण्यात आली असून या दोन्ही प्रकरणातील आरोपीं विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. दोन्ही हत्या जातीवादातून केल्याचे निष्पन्न होत असल्याने आरोपीं विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी ही करण्यात आली आहे.

यावेळी झालेल्या निषेध सभेमध्ये दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून मनुवादी प्रवृत्तींवर हल्ला चढविला. देशाला शरमेने मान खाली झुकवणारी ही घटना आहे, खैरलांजी, सोनाई हत्याकांड घडते, बाबासाहेबांची साधी रिंगटोन वाजविली म्हणून दलित युवकाची हत्या होते. अशा घटनांमुळे पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या या महाराष्ट्राला जातीवादी महाराष्ट्र म्हणून गणले जाणार आहे असे निश्चित वाटते आहे अशी खंत व्यक्त करण्यात आली.

अक्षय भालेराव याने गावात पहिल्यांदा डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी केली, बाबासाहेबांच्या विचारांचे बीज अक्षयने पेरायला सुरुवात केली होती म्हणूनच त्याची हत्या करण्यात आली आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. भारत सरोदे, अश्विन वाघमारे ,अमित सोनवणे, नागसेन धेंडे ,मतीन शेख, नरेश वाल्मिकी तसेच शहरातील सर्वच दलित संघटनांचे पदाधिकारी व भीम अनुयायी यावेळी उपस्थित होते.