अब्बास शेख
दौंड : दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथे श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाने झाली.
श्री दत्त जयंतीनिमित्त शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर २०२५ पासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जयंती महोत्सवाचे हे ३२ वे वर्ष होते. या अखंड हरीनाम सप्ताहची समाप्ती दि.५ डिसेंबर रोजी झाली. या अखंड हरिनाम सप्ताहात काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, भागवत कथा, कीर्तन, भजन अश्या विविध कार्यक्रमांचे सलग सात दिवस आयोजन करण्यात आले होते.
या हरिनाम सप्ताह कार्यक्रमाच्या सुरुवातीला हभप श्री सुदाम गोरखे गुरुजी, श्री लक्ष्मणनाथजी महाराज यांच्या हस्ते विनापूजन व कलशपूजन करण्यात आले. ग्रंथ पूजन व साहित्य पूजन हभप श्री राहुल महाराज राऊत, हभप श्री तात्यामहाराज ढमाले (सर), भजनगंधर्व श्री आदिनाथजी सटले गुरुजी यांच्या हस्ते झाले. गुरुवार दि. ४ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते हभप माधवजी महाराज रसाळ (भागवताचार्य, पुणे) यांचे श्री दत्त जन्म किर्तन तर दि. ५ डिसेंबर रोजी त्यांचेच काल्याचे किर्तन झाले. या ठिकाणी संगीत संयोजक म्हणून श्री विजयजी बागडे (मध्यप्रदेश) यांचे सहकार्य लाभले आहे. व्यासपीठ चालक म्हणून हभप आबा महाराज खेडेकर (बीड) आणि हभप दिनकर महाराज देवडकर (आळंदी देवाची) यांनी कामगिरी पार पाडली.
या कार्यक्रमाला बोरिपार्धी आणि परिसरातील शेकडो महिला भगीणी आणि पुरुषांनी सलग सात दिवस हजेरी लावली. विविध धार्मिक कथा आणि कार्यक्रमांनी येथील वातावरण भक्तिमय बनले होते. कथेच्या यजमानपदाचा मान श्री अनिल गडधे व सौ. रेश्मा गडधे या दांपत्याला लाभला. अखेरच्या दिवशी हरीनाम सप्ताहाची सांगता काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने झाली.
या सप्ताहाचे आयोजन श्री दत्त सेवा मंडळ बोरीपार्धी यांच्यावतीने करण्यात आले होते. हा संपूर्ण कार्यक्रम स्वरसाधना भजन संध्या प्रतिष्ठानचे प्रमुख मल्हारी सोडनवर यांच्या मार्गदर्शनाखाली व बंडू नेवसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमासाठी अशोक अडसूळ, शेखर सोडनवर, नीलेश ताडगे, दशरथ दिवेकर, प्रशांत ताडगे, सुरेश तळेकर, बापू जगताप, दादा नेवसे, सुनील माने यांनी विशेष परिश्रम घेतले.






