दौंड : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते अजितदादा पवार हे आपल्या भाषणाच्या खास शैलीने परिचित आहेत. सडेतोड बोल, स्पष्टवक्तेपणा पण तितक्याच परीने कार्यकर्ता चुकला तर त्याला त्याची चूक तेथेच दाखविण्याची शैली ही फक्त अजितदादांकडेच आहे. काल पारगाव ता. दौंड येथील शेतकरी मेळाव्यावेळीही अजितदादांची ही खुबी सर्वांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली.
झाले असे कि, पारगाव येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अजितदादांच्या भाषणाला सुरुवात होताच त्यांकडे अनेकांची निवेदने आली त्यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील विविध प्रश्न आणि मागण्यांचा उल्लेख होता. या मागण्यांबाबत अजितदादांनी बोलताना मी तर सर्वांचीच कामे करत आलो आहे आणि करतोही आहे. पण अख्ख्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला यश आले असताना फक्त दौंडचाच माझा आमदार तुम्ही पाडला अशी खंत त्यांनी व्यक्त केली मात्र झाले भलतेच, समोरील मंडळींनी येथे शांत बसण्याऐवजी टाळ्या वाजवल्या आणि अजितदादाही थोडावेळ बुचकाळ्यात पडले. असाच प्रकार पुढेही घडल्याने त्यांनी शेवटी स्वतःच्याच कपाळावर मारून घेतले.
अजितदादांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर टिका करताना त्यांनी आणखी भरपूर बोलावे, खास शैलीत टिका करावी अशी इच्छा येथील उपस्थितांची होती पण अजितदादांनी भीमा पाटस कारखाना हा चालकांच्या नाकर्तेपणामुळे बंद डबघाईला आला असून याला सर्व संचालक मंडळ जबाबदार असल्याचे म्हटले आणि शेजारी सुरु असणाऱ्या तिन्ही खाजगी कारखान्यांची सद्य परिस्थिती कथन करताना त्यांच्या कामाची स्तुती केली. शिवाय दौंड शुगर हा खाजगी कारखाना लवकरच सात हजाराहून थेट सतरा हजार गाळप क्षमतेचा होणार असल्याचे सांगताच कार्यकर्ते मात्र बुचकाळ्यात पडल्याचे दिसले.
कारण इच्छा होती खाजगी कारखान्यांवर टिकेची आणि भीमा पाटस कारखान्यावरून आमदार राहुल कूल यांना घेरण्याची मात्र येथे वेळगेच होत असताना दिसल्याने नेमक्या टाळ्या कुठे वाजवायच्या आणि कुठे थांबायचे हे मात्र कार्यकर्त्यांना उमजत नव्हते.