बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज बारामती येथील आप्पासाहेब पवार सभागृहात दिवाळी शुभेच्छा कार्यक्रमात अनुपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले. आज दिवाळी पाडव्यानिमित्त सर्वच तळागाळातील कार्यकर्ते पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी बारामती येथे उपस्थित असताना आणि शुभेच्छांचा स्वीकार करायला जेष्ठ नेते शरद पवार साहेब, खा.सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांसह मान्यवर उपस्थित असताना नेमके अजितदादा येथे का नाहीत असा सवाल कार्यकर्त्यांना सतावत होता. मात्र, कार्यकर्त्यांची उलघाल आणि त्यांच्या नजरा कोणाला शोधत आहेत हे ओळखून जेष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याचे कारण स्पष्ट केले आणि कार्यकर्त्यांची चिंता आणखीनच वाढली.
शरद पवार यांनी अजित पवार हे कार्यक्रमाला न येण्याचे कारण त्यांच्या वाहन ताफ्यांतील दोन चालक आणि इतर असे तिन जनांना कोरोनाची लागण झाली असून त्यामुळे अजित पवार यांनीही कोरोना टेस्ट करून घेतली असून अजून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे त्यामुळे आपल्यामुळे इतरांना काही त्रास होऊ नये यासाठी अजित पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत असे पवार यांनी सांगून अजित पवार या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचे कारण सर्वांना सांगितले आणि राज्यातून आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेली चर्चा थांबली.