बारामती : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता सर्वात जास्त लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात रोज नवनवीन घटना घडत आहेत. आता अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावरच टीका केली असून अजित पवार यांनी जो निर्णय घेतला आहे तो आपल्याला पटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. बारामतीमध्ये येथील एका बैठकीत ते उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत होते. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या या वक्तव्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे
काय म्हणाले श्रीनिवास पवार..
श्रीनिवास पवार यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना, मी प्रत्येक वेळी चांगल्या, वाईट काळात अजित पवारांसोबत उभा राहिलो आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमागे मी उभा राहिलो. त्यांनी जे जे निर्णय घेतले त्याला मी साथच देत आलो. निर्णय घेताना मी त्यांना कधीही असं का म्हणून विचारलं नाही. मात्र हे सर्व करत असताना शरद पवार साहेबांचे सुद्धा आपल्यावर मोठे उपकार आहेत आणि त्यांच्यामुळेच आपल्याला सर्व काही मिळालं आहे. त्यातच आता उतरत्या वयात ज्यावेळी साहेबांचं वय 80 वर्षांच्या पुढे झालं आहे या अशा स्थितीमध्ये त्यांना एकटं सोडणं मला पटत नाही असं श्रीनिवास पाटील यांनी म्हणत आपण शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यामागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.