पुरंदर : आज पुरंदर येथे झालेल्या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसूमने उधळली. पुरंदर मध्ये शिवतारे यांच्यावर अजित पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र अजित पवारांनी शिवतारे यांच्यावर भाष्य करण्याचे टाळले.
मोदींची मोठ्या प्रमाणावर स्तुती… अजित पवारांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करताना जम्मू काश्मीर चे कलम 370 हे फक्त मोदींमुळे निघाले त्यामुळे आता आपण तेथे जमिनी घेऊ शकतो असे म्हणत जे 500 वर्षांत राममंदिर झाले नाही ते मोदींनी करून दाखवले, पुलवामा नंतर थेट पाकिस्तानवर हल्ला केला हे फक्त मोदींनी केलं असे अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.
माझ्या विचारांचा खासदार निवडून द्या, पुरंदरची बारामती करतो.. अजित पवारांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना, माझ्या विचाराचा ‘खासदार’ निवडून द्या, ‘पुरंदर’ ची बारामती करतो.. असे म्हणत 1999-2000 साली पुरंदर उपसा सिंचन योजनेची 220 कोटी रुपयांची फाईल मी स्वतः मागवून त्यावर सही केली आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेचे काम सुरु झाले. राज्यसरकार च्या विचाराचा आमदार निवडून गेला तर मोठ्या प्रमाणावर कामं होतात. माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या तुम्हाला बारामती सारखं करून दाखवणार. असे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.
मोदींबाबत पुन्हा बोलताना, व्हिजन असणारा नेता असला तर देशाची प्रगती होते. हजारो कोटींची विकासकामे मोदींनी केली. जपान अर्धा टक्क्याने आपल्याला कर्ज देतं. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात आपण पाचव्या क्रमांकावर आहोत मोदींना ते तिसऱ्या क्रमांकावर आणायचे आहे. 80 कोटी लोकांना घरं देण्याचा कार्यक्रम आहे. प्रत्येकाला घर देण्याचा मानस आहे. आता फक्त मागासवर्गीयच नाही तर आर्थिक मागास असणाऱ्या प्रत्येक जाती, धर्माच्या लोकांना घरे मिळणार आहेत. पाण्याच्या योजनेसाठी केंद्राने 50% निधी दिला आहे. कांदा उत्पादक 5% टक्के आणि कांदा खाणारे 95% टक्के आहेत. त्यामुळे कांदा खाणाऱ्यांनाही परवडले पाहिजे आणि विकणाऱ्यांही असे धोरण आखले जात आहे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं व्याज घेऊ नये असं सरकारने कळवलं अशी माहिती आपल्याला पिडीसीसी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.