मुंबई : महायुती सरकारमधील राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्र सादर करताना त्यामध्ये खोटी माहिती दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सिल्लोड न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
राज्यसरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी २०१४ तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचे तक्रारदार यांनी म्हटले होते. सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी २०२१ साली याबाबत सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात सिल्लोड न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा २०१४ रोजी खरेदी केलेली जमीन आणि त्यानंतर चार ते पाच वेळा खरेदी केलेल्या जमिनी याबाबत देण्यात आलेल्या माहितीमध्ये तफावर असल्याचं न्यायालयाच्या तपासात आढळून आलं आहे.
त्यामुळे सिल्लोड न्यायालयानं या प्रकरणी फौजदारी खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. सिल्लोडच्या न्यायालयाकडून अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे आदेश दिल्याने राजकीय गोटात मोठी खळबळ माजली आहे. जर हे आरोप सिद्ध झाले तर मात्र अब्दुल सत्तार यांची आमदारकी जाण्याची शक्यता असून त्यामुळे त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही.