कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक विशेष | सहकारक्षेत्रात भाजपने दंड थोपटले, राष्ट्रवादीचीही व्यूहरचना तयार.. 26 तारखेला खा.संजय राऊत यांचा दौंडमध्ये धमाका

राजकीय वार्तापत्र | अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील राजकारण हे कुल-थोरात गटाभोवती फिरत असते. येथे पक्षापेक्षा कुल आणि थोरात या पारंपरिक दोन गटातील राजकीय हाडवैर हा संपूर्ण जिल्ह्यात चर्चीला जाणार विषय आहे.

दौंड तालुका खरेदी विक्री संघाची नुकतीच निवडणूक झाली यामध्ये राष्ट्रवादीने मा.आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एक जागा वगळता सर्वच जागेवर विजय मिळवला होता. मात्र या निवडणुकीत मीडियाने जितकी चर्चा थोरात गटाच्या (राष्ट्रवादीच्या) निवडून आलेल्या उमेदवारांची केली नाही तितकी चर्चा विद्यमान आमदार राहूल कुल गट (भाजप) च्या निवडून आलेल्या एका उमेदवाराची केली असल्याने सहकार क्षेत्रात भाजप पाय पसरत असल्याचे यावरून स्पष्ट झाले.

सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली असून या निवडणुकीसाठी 208 इच्छुक्कांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत 20 एप्रिल रोजी संपत असून या नंतर मात्र निवडणुकीला रंग चढणार आहे. कुल गट (भाजप) ने या निवडणुकीत जोरदार तयारी करत दंड थोपटून मैदानात उतरले आहेत तर कुल गट (भाजप) ला जशास तसे उत्तर देण्यासाठी थोरात गट (राष्ट्रवादी) नेही मोठी तयारी केली असून 28 एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने त्या अगोदर दी. 26 एप्रिल रोजी खासदार संजय राऊत यांची पाटस (ता.दौंड) येथे मोठी सभा आयोजित केल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगत आहेत.

खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच भीमा पाटस कारखान्यावरून दौंड चे भाजप आमदार राहूल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत आणि आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर दौंडमध्ये सभा होणार असल्याने या सभेतही ते याच मुद्द्यावर जास्त जोर देतील यात शंका नाही. त्यामुळे आमदार राहूल कुल गट (भाजप) ने या निवडणुकीत दंड थोपटून उतरले असताना थोरात गट (राष्ट्रवादी) नेही त्यांना जशास तसे उत्तर देण्याची तयारी सुरु केली आहे.

‘कुणाकडे कोणत्या संस्था ’
माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे मा.अध्यक्ष रमेश थोरात यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, पंचायत समिती, दौंड नगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक, दूध संघावर संचालक अशी सहकारतील मोठी सत्तास्थाने आहेत. तर भाजप आमदार अॅड. राहुल कुल यांच्याकडे आमदार पद, भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पद व दौंड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद अशी सत्ता आहे.