अख्तर काझी
दौंड : शहरातील एका भंगार माल खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याची साखर कारखान्यातील शेतकी अधिकाऱ्याने आर्थिक फसवणूक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. आपण शेतकी अधिकारी असून तुम्हाला कारखान्याचे भंगार माल घेऊन देतो असे सांगून व्यापाऱ्याची तीन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वसीम मोहम्मद हनीफ शेख (रा. पाटील चौक, दौंड) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी सर्जेराव रामचंद्र शिंदे (रा. पिंपळगाव पिसा, श्रीगोंदा, जिल्हा नगर) याच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भंगार माल खरेदी, विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी सर्जेराव याने दि. 10 जुलै 2021 रोजी फिर्यादी यांची भेट घेतली व आपण भीमा पाटस साखर कारखान्यामध्ये शेतकी अधिकारी म्हणून काम करीत आहे असे सांगितले. आमच्या कारखान्यामध्ये शेतकी अधिकारी यांच्याकडील लोखंडी बैलगाडी व इतर वाहने भंगार मध्ये विक्रीसाठी काढलेली आहेत ते मी तुम्हाला दाखवतो म्हणून त्याने फिर्यादी यांना कारखान्यात घेऊन गेले. या सर्व मालाचा लिलाव करायचा असून तुम्हाला 5 लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागेल असे सांगितले.
दि.18 जुलै 2021 रोजी फिर्यादी यांनी सर्जेराव याला येथील कल्पलता हॉटेल येथे बोलावून घेतले व पाच लाख रुपये अनामत रक्कम म्हणून दिले. फिर्यादी यांनी 10-12 दिवसानंतर त्याला या व्यवहाराबाबत विचारले असता, लिलावाची प्रक्रिया झालेली आहे तुम्हाला माल उचलण्याची वर्क ऑर्डर 15 ते 20 दिवसांमध्ये देतो असे सांगितले. ठरल्याप्रमाणे फिर्यादी यांनी त्याला फोन केला असता त्याने फोन उचलण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादी त्याच्या घरी गेले व वर्क ऑर्डर चे काय झाले याची चौकशी केली असता, सदरील भंगाराचा लिलाव रद्द झाला असल्याचे त्यांनी सांगितले. व फिर्यादी यांनी त्याला दिलेल्या पाच लाख रुपये अनामत रकमेच्या बदल्यात त्याने त्या रकमेचा धनादेश दिला.
परंतु तो धनादेश बँकेत जमा केला असता त्या खात्यात पुरेशी रक्कम नाही या कारणास्तव वटला नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी त्याला वारंवार पैशाची मागणी केली. परंतु माझ्याकडे पैसे शिल्लक नाही मी तुम्हाला नंतर देतो असे तो सांगू लागला. दरम्यान त्याच्या मुलाने (अतुल सर्जेराव शिंदे) पैसे परत करण्याची हमी घेतली. त्याने दोन लाख रुपये परत सुद्धा केले. परंतु उर्वरित रक्कम देण्यास मात्र टाळाटाळ सुरू केली. काही दिवसांनी तर, मी तुझे पैसेच देणार नाही काय करायचे करून घे म्हणून सर्जेराव शिंदे याने फिर्यादी यांना फोनवर धमकी दिली. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी दि.16 नोव्हेंबर 2023 रोजी दौंड पोलिसात तक्रार केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गटकुळ करीत आहेत.