वरवंड येथील महिलांचे पैसे घेउन एजंट फरार..! अनेक महिलांची फसवणूक

वरवंड : दौंड तालुक्यातील वरवंड येथे कर्जाची रक्कम घेउन एजंट फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे घरी येउन पुस्तकावर पैसे जमा करणाऱ्या एजंटांकडून पुन्हा एकदा फसवणूकीचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे पुस्तकावर नियमितपणे सेव्हिंग चे पैसे भरणाऱ्या अथवा कर्जफेडीची रक्कम भरणाऱ्या लोकांची आर्थिक फसवणूक होऊ लागल्याने आता या लोकांना पोलीस स्टेशनला जावून तक्रार दिल्याशिवाय पर्याय उरला नाहीये.

वरवंडला असाच एक प्रकार उघडकीस आला असून फसवणूक झालेल्या या चार महिलांनी आपली आपबीती कथन केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व महिला सर्वसामान्य कुटुंबातील मोलमजुरी करणाऱ्या असून या महिलांना एका वित्तीय खाजगी संस्थेने संपर्क साधून तुम्ही महिलांचे एकत्रित गट तयार करा आम्ही तुम्हाला प्रत्येकी पन्नास हजार कर्ज देऊ असे सांगितले होते. त्यानंतर गट तयार करुन या महिलांचे भिगवण येथील फेडरल बँकेमध्ये खाते उघडण्यात आले आणि त्यांना त्यांच्या खात्यावर त्या वित्तीय संस्थेकडून कर्ज दिले गेले.

या सर्व महिलांनी काबाडकष्ट करुन इमानदारीने कर्जाची रक्कम भरली. ही रक्कम घेण्यासाठी त्या संस्थेचा एक एजंट यायचा आणि कर्जाच्या हफ्त्याची रक्कम घेउन तो पुस्तकामध्ये एंट्री करुन जमा दाखवून निघून जायचा. या कर्ज रकमेचे शेवटचे चार हफ्ते राहिले असताना या एजंटने महिलांना फोन केला आणि चार हफ्त्यांची पूर्ण रक्कम माझ्याकडे जमा करा मी तुम्हाला लगेच प्रत्येकी एक लाख वीस हजार रुपये कर्ज देऊन टाकतो असे सांगितले.

त्या एजंटच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन या महिलांनी एकूण 34,634 रुपये एक गठ्ठा रक्कम त्याला ऑनलाईन जमा केली आणि पुस्तकावर त्याने सही करुन एंट्री केली. वरवंड येथील यात्रेच्या तोंडावर आपल्याला कर्ज मिळेल आणि आपल्या अडचणी दूर होतील या आशेने या महिलांनी इकडून तिकडून उसने पैसे घेउन त्या एजंटला पैसे दिले होते.

मात्र त्यानंतर त्या एजंटने उडवाडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्या महिलांना संशय आला आणि त्यांनी खात्री करण्यासाठी भिगवण येथील फेडरल बँकेत जावून त्यांच्या कर्ज खात्यावर त्या एजंटने पैसे भरले की नाही याची चौकशी केली असता त्यांच्या कर्ज खात्यावर त्या एजंटने रक्कम भरलीच नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी या एजंटला फोन लावला असता त्याने फोन बंद करुन ठेवला होता.

त्यामुळे या एजंट ने आपली आर्थिक फसवणूक केली असल्याचे आणि पुढील कर्ज तर सोडाच उलट आपण दिलेले चार हफ्त्याचे पैसे सुद्धा त्याने कर्ज खात्यावर भरले नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ‌साधना घोडेके, विमल घोडके, सोनाली घोडके आणि मिरा भोगे अशी फसवणूक झालेल्या या चार महिलांची नावे असून त्या लवकरच यवत पोलीस स्टेशनला त्या एजंट विरोधात आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.