पुण्यानंतर सांगली जिल्ह्यातही पावसाची जोरदार हजेरी, वारणा धरणातून विसर्ग सुरु

सुधीर गोखले

सांगली : बाप्पाच्या आगमनाबरोबरच सुरु झालेल्या पावसाने राज्यातील विविध जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. यात पुण्यानंतर सांगली जिल्ह्याचाही समावेश असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार गणेश विसर्जनानंतरही म्हणजे २ ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस राहणार आहे. विशेष करून दि २८ सप्टेंबर म्हणजे गणेश विसर्जनाला राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यात सर्वदूर पाऊस असून धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे त्यामुळे त्यातून पाण्याचा १५०० क्युसेक्सने विसर्ग सुरु करण्यात आला असून वारणा नदी तीरावरील नागरिकांना पाटबंधारे खात्याने सावधगिरीचा इशारा दिला आहे. गेले दोन दिवसांपासून सांगली शहरासह मिरज कवठेमहांकाळ, तासगाव, शिराळा, पलूस आदी तालुक्यांमधून पावसाची रिमझिम सुरूच आहे. आत किमान रब्बी हंगाम हाताशी येण्याच्या अपेक्षांनी शेतकरी वर्गात समाधान आहे.

सध्या सुरू असलेल्या पावसाने जमिनीमध्ये पुरेशी ओल आल्याने मशागतीच्या कामांना वेग येईल. जिल्ह्यातील शाळू, हरभरा, गहू, मका, यासारख्या पिकांना जीवदान मिळणार आहे. बहुतांश गणेश मंडळांनी आपले देखावे आता खुले केल्याने बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांची पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली आहे. या पावसाने रस्त्याच्या कामाचे एक प्रकारे ‘ऑडिट’ च केले आहे. सखल भागामध्ये पाणीच पाणी झाले. तर अल्पावधीतच पडलेल्या खड्यांमध्ये पाणी साचून राहिले. राजवाडा चौक काँग्रेस कमिटी सारख्या ठिकाणी या पावसामुळे पाणीच पाणी झाले आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांमध्ये ९.९ मिमी पाऊस नोंदवण्यात आला असून नेहमी पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या आटपाडी तालुक्यात सर्वाधिक २७.९ मिमी पाऊस झाला आहे.