मुंबई : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagatsing koshari) यांनी मुंबईबाबात केलेल्या विधानानंतर राज्यात राजकीय पाटलावर मोठे वादंग निर्माण झाले आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाचा अनेकांनी निषेध केला आहे.
भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना जर महाराष्ट्रात गुजराती आणि राजस्थानी लोक राहिले नाहीत, त्यांना इथून काढले तर मुंबईत पैसेच राहणार नाहीत आणि जी मुंबई आर्थिक राजधानी म्हणवली जाते ती आर्थिक राजधानी राहणारच नाही असे वक्तव्य केले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या विधानानंतर राज्यातील विविध भागातून टिकेची झोड उठत असून खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्यपालांच्या विधानाचा निषेध करत खरपूस समाचार घेतला आहे.
याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे विधान मराठी माणसांना कमी लेखणारे असे आहे. त्यांच्या विधानाचा मराठी माणूस म्हणून मी निषेध करते. याच मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले. लाखो मराठी माणसांच्या वज्रमुठीमुळे हे शहर उभा राहिले आहे. राज्यपाल महोदयांचे हे विधान त्या हुतात्म्यांचा अवमान करणारे आहे. हे शहर कष्टकरी, कामगार आणि मजूरांनी कष्टाने उभारले. मुंबईवर पहिला हक्क या सर्वांचा आहे. जो या मातीत जन्माला आला आणि मुंबईवर प्रेम करतो त्या सर्वांसाठी ही ‘आमची मुंबई ‘ आहे असे म्हटले आहे.