अख्तर काझी
दौंड : तालुक्यातील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड (आलेगाव) कारखान्याचा विस्तारवाढ व गळीत हंगाम शुभारंभाचा कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र सदरचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते केला जाऊ नये असा विनंती वजा इशारा दौंड शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. समाजाच्या वतीने तहसीलदारांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनातून ईशारा, प्रशासकीय यंत्रनेची धावपळ… सकल मराठा समाजाने दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक शहर व गावांमध्ये साखळी उपोषण तसेच मंत्री, लोकप्रतिनिधी, पुढार्यांना गावबंदी आंदोलने सुरू आहेत. दौंड तालुक्यातही सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण आंदोलन करण्यात येत आहे. गुरुवार दि.2 नोव्हेंबर रोजी दौंड शुगर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. अजित पवार सध्याच्या सरकारमध्ये महत्त्वाचे घटक आहेत,व सकल मराठा समाजाचा सरकारवर असणारा रोष दिवसेंदिवस वाढत असल्याने समाजाच्या वतीने कदाचित अजित पवारांच्या विरोधात निषेध होण्याची मोठी शक्यता आहे.
अजितदादांबद्दल नितांत आदर, विश्वास मात्र सध्याची वेळ समजून घ्यावी… अजितदादा अभ्यासू व्यक्तिमत्व आहे हे सर्वश्रुत आहे, त्यांच्याकडून समाज फार मोठ्या अपेक्षा बाळगून आहे मात्र सध्याची वेळ हि वेगळी आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना समजून घेत आयोजकांनी सदरचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करू नये व समाजाचा संभाव्य रोष ओढवून घेऊ नये असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सकल मराठा समाजाचे विक्रम पवार, शैलेंद्र पवार, राजाभाऊ कदम, अविनाश गाठे, रोहन घोरपडे, सज्जन काकडे, प्रमोद पवार, वैभव जठार, राहुल पवार, दादासो नांदखीले, प्रथमेश कदम, देवेंद्र अवचर, राकेश भोसले, विठ्ठल दरेकर आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.