अखेर ‘त्या’ पोलिसाने ‘आत्महत्या’ केलीच! पुणे जिल्ह्यात खळबळ

पुणे : पोलिसांवर होत असलेले हल्ले आणि त्यांचा वाढत चाललेल्या मानसिक ताण यावर नुकतेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आवाज उठवला होता. सध्या पोलिस मोठ्या मानसिक तणावातून जात असून याचा परिणाम त्यांच्या कौटुंबिक जीवनावरही होत आहे. यातून मग नैराश्य येऊन पोलिस आत्महत्येसारखा पर्याय निवडत असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

अशीच एक घटना शिरूर तालुक्यातील नवले मळा (ता.शिरूर) येथे घडली असून शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी जितेंद्र मांडगे या पोलिस कर्मचाऱ्याने एका विशिष्ट कारणामुळे नवले मळा येथील विहीरीच्या रहाटाला गळफास घेऊन अखेर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिस कर्मचारी जितेंद्र उर्फ हरिभाऊ केशव मांडगे (वय ३४ वर्षे रा. पिंपरी ता. पारनेर जि. अहमदनगर) हे अनेक महिन्यांपासून एका विशिष्ट कारणामुळे मानसिक तणावाखाली होते. त्यांनी एक वर्ष अगोदर म्हणजे जानेवारी 2022 मध्ये नगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेथील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला होता.

मांडगे हे एका विशिष्ट कारणामुळे तणावात होते. त्यांनी गळफास घेण्यापूर्वी एका नातेवाईकाला आपण आत्महत्या करत असल्याची माहितीही दिल्याचे समजत आहे. त्यांनी आत्महत्येची माहिती दिल्यानंतर त्यांचा शोध सुरु करण्यात आला होता. काही त्यांना शोधत नवले मळा येथे गेले असता जितेंद्र मांडगे हे विहिरीच्या रहाटास गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आले. यावेळी त्यांना उपचारासाठी शिरूर येथील माणिकचंद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्यांना तेथे मृत घोषित करण्यात आले.