अख्तर काझी
दौंड : शहरामध्ये सर्रासपणे गांजाची विक्री केली जात होती. या संदर्भात थेट तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडेच तक्रारी करण्यात आल्याने दौंड पोलिसांनी येथील हुतात्मा चौक परिसरात गांजा विकणाऱ्या महिलेवर एन डी पी एस कायदा 1985 कलम 8(ब), 20(ठ) प्रमाणे कारवाई करून तिला अटक केली आहे. तिच्याकडून तब्बल 1 किलो 11 ग्रॅम गांजा ( किंमत रु.15 हजार) जप्त करण्यात आला आहे.
बेबी रूबेन राठोड (वय 65,रा. सिद्धटेक रोड, भीम नगर, दौंड) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संजय कोठावळे यांनी फिर्याद दिली आहे. दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.26 मे रोजी खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की येथील हुतात्मा चौकातून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बेबी राठोड ही महिला गांजा विक्रीकरिता थांबली आहे. सदरची माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांना दिली असता त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले.
पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा मारला असता सदर महिला कट्ट्यावर बसलेली दिसल्याने तिला पकडण्यात आले. महिला बसलेल्या ठिकाणी व लगतच्या झोपडीची तपासणी केली असता तेथे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गांजा (1 किलो 11 ग्रॅम) सापडला. त्यापैकी 100 ग्रॅम गांजा सीए तपासणीसाठी काढून उर्वरित गांजा सुद्धा पोलीस निरीक्षक व पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे.
शहरातील हुतात्मा चौकासह इतर ठिकाणीही गांजा विक्री केली जाते त्यामुळे दौंड शहराला गांजा पुरविणाऱ्या मुख्य पुरवठादाराच्याच मुस्क्या दौंड पोलिसांनी आवळायला हव्यात अशी मागणी दौंडकर करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, पोलीस हवालदार नितीन बोराडे, पांढरे, राऊत, पोलीस कॉन्स्टेबल माने, धावडे या पथकाने केली.