पुणे : सध्या स्वयंघोषित पत्रकारांचा सुळसुळाट झाल्याचे पहायला मिळत आहे. मोबाईलमध्ये दिडशे रुपयांचे अॅप इंस्टॉल करायचे आणि त्यावर लिखाण करून वृत्तपत्रासारखी बातमी तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करायची असा नवीन फंडा बोगस, स्वयंघोषित संपादक आणि पत्रकार करू लागले आहेत. विशेष म्हणजे अनेकांनी प्रेस आयकार्ड सुद्धा छापले असून अश्या बोगस प्रेस आयकार्ड छापणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकृत वृत्तपत्रांचे संपादक त्या त्या स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार देणार असल्याचे समजत आहे.
बोगसगिरीचे वरिल प्रकार हे वृत्तपत्र जगतासाठी गंभीर बाब असून या अनधिकृत बातम्या छपाईच्या माध्यमातून अनेकांची नाहक बदनामी करणे, ब्लॅकमेलिंग करणे, एखाद्याला टार्गेट करून त्याची समाजात प्रतिमा मलीन करणे अश्या गोष्टी सर्रास घडू लागल्या आहेत.
काय आहे अधिकृत वृत्तपत्रांची प्रक्रिया – रजिस्टर न्यूजपेपर ऑफ इंडिया म्हणजेच आरएनआय (RNI) ही भारत सरकारची संस्था असून या ठिकाणी वृत्तपत्रे रजिस्टर केली जातात. मात्र अनेकवेळा असे पाहण्यात आले आहे की वृत्तपत्र रजिस्टर केले नसताना केवळ त्याच्या नावाचे जे टायटल मिळाले आहे त्या टायटलवरून वृत्तपत्र छापण्यास सुरुवात केली जाते. त्याच्या नावाने सोशल मिडियावर बातम्यांच्या कटिंग तयार करून त्या व्हायरल केल्या जातात आणि आम्ही अधिकृत माध्यमाचे पत्रकार बनलो अश्या अविर्भावात समाजात स्वतःला प्रमोट केले जाते.
मात्र आता नुसत्या टायटल कोडवर तुम्हाला वृत्तपत्र, बातम्या छापता येणार नाही, तुम्हाला पीआरजीआय रजिस्ट्रेशन नंबर घ्यावा लागेल. पीआरपी कायदा 2023 कलम 7(6) नुसार ज्यावेळी पीआरजीआय (Rni) चा रजिस्टर नंबर मिळेल त्यावेळी वृत्तपत्र, बातम्या छापता येईल असे आरएनआय कडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच जो कोणी असे कृत्य करताना आढळेल त्यावर पीआरपी कायदा 2023 कलम 14 (1) (ए) नुसार कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट ईशारा रजिस्टर न्यूजपेपर ऑफ इंडिया या भारत सरकारच्या विभागाकडून देण्यात आला आहे.
येथे करता येते तक्रार – जर अश्या प्रकारचे कृत्य कोणी करत असेल तर त्याच्या पेपरच्या, बातम्यांच्या कटिंग तुम्ही आरएनआय ला पाठवून अश्या वृत्तपत्र आणि ते छापणाऱ्या लोकांवर कारवाईचे मागणी करू शकता.