दौंड : खामगाव (ता.दौंड जि.पुणे) येथे एका व्यक्तीचा खून आणि दुसऱ्या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपीला यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. खूनाची घटना 31/03/2023 रोजी सायंकाळी 06:30 ववाजण्याच्या सुमारास खामगाव येथे घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पिंटू अशोक गायकवाड याने फिर्यादी कवडे यांच्या गोठ्यावरील कामगार 1) मुकेश उर्फ मुक्तार यादव (वय 45,रा धरम पूर,उत्तर प्रदेश) याचा अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने गळा चिरून खून केला होता तर 2) रामकुमार यादव (वय 44 वर्षे रा डिग्गी उत्तर प्रदेश) यालाही शस्त्राने सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. गुन्हा घडल्यापासून सदरचा आरोपी हा फरार असल्याने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अंकित गोयल यांनी पोलिसांना या आरोपीचा शोध घेऊन त्यास पकडून आणण्याच्या विशेष सूचना केल्या होत्या.
त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी यवत पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक तयार करत मार्गदर्शन केले आणि गुन्हा घडलेल्या ठिकाणचे व आसपासचे सीसीटीव्ही तपासले होते. याकामी गोपनीय खबऱ्याचीही मदत घेण्यात आली होती. यावेळी यवत गुन्हे शोध पथकाला खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की आरोपी पिंटू अशोक गायकवाड हा रावणगाव,खडकी ता. दौंड या परिसरात दिसून येत आहे. खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर आरोपी फिरत असलेल्या परिसरात पोलिसांनी वेशांतर करून सापळा लावला होता त्यात वरील आरोपी अलगद अडकला. त्यास ताब्यात घेतल्यानंतर आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोसई प्रशांत मदने, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, गणेश कुतवळ, पोलीस शिपाई मारुती बाराते यांच्या पथकाने केली आहे.