दौंड : यवत, राहू परिसरात रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या आरोपिंना जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले आहे. याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे दि.१५/०८/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी राणी नितीन यादव (रा. यवत ता. दौंड, जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिराचे लग्न असल्याने त्या मुलीला घेवुन यवत वरून राहु गावाकडे स्कुटीवरून जात असताना बागवस्ती या ठिकाणी त्यांच्या मागुन एक भगव्या रंगाची गाडी आली. त्यावर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी राणी यादव यांच्या गळयातील साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण ज्याची किंमत १ लाख ५७ हजार ५०० चे इतकी आहे. ते जबरदस्तीने हिसकावुन घेवुन गेले. त्याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करीत असताना सदरचा गुन्हा हा इसम १ ) सिंदबाद जैन पवार (वय ३० वर्षे) २) गणेश भारत पवार (वय २४ वर्षे, दोघे रा. वाखारी, ता दौंड, जि पुणे) यांनी केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्या दोघांना यवत पोलिसांनी चौफुला येथुन ताब्यात घेवुन सखोल चौकशी केली. या चौकशीत आरोपिंनी गुन्ह्याची कबुली दिली.
तसेच या आरोपिंनी दिनांक ०६ /०३/२०२४ रोजी यवत गावचे हद्दीत असणाऱ्या श्रेयश हॉटेलच्या अलिकडे रामदास भाउसाहेब शेंडगे (रा. उंडवडी, ता दौंड, जि. पुणे) यांच्या गळयातील सोन्याची चैन व अंगठी असे जबरदस्तीने घेवुन पळाले होते असे सांगितले. सदर आरोपीकडुन दोन्ही गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे गंठण, सोन्याची चैन व मोटार सायकल असा एकुण २ लाख ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, गणेश बिरादार (अपर पोलीस अधीक्षक, बारामती) आण्णासाहेब घोलप, (उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड) बापुराव दडस, उपविभागीय पोलीस अधिकारी,दौंड) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सपोनि महेश माने, सहा. पोलीस उपनिरीक्षक, संजय देवकाते, पोलीस हवालदार गुरूनाथ गायकवाड, पोलीस हवालदार अक्षय यादव, पोलीस हवालदार रामदास जगताप, पोलीस हवालदार महेंद्र चांदणे, पोलीस कॉस्टेबल मारूती बाराते, पोलीस कॉस्टेबल मोहन भानवसे यांचे पथकाने केलेली आहे.