दौंड : यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जबरी चोरी व घरफोडी करणारी टोळी जेरबंद करून १४ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करण्यात यवत पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. २६/०१/२०२५ रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास नेवसेवस्ती खोर, ता. दौंड येथे फिर्यादी उत्तम शंकर नेवसे यांच्या राहते घरामध्ये प्रवेश करून सुरा तसेच कोयत्याचा धाक दाखवून अनोळखी तीन इसमांनी घरातील कपाटात ठेवलेली ३०,०१७ रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरून नेले होते.
यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खोर परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती प्राप्त केली असता सदरचा गुन्हा हा रोहित उर्फ पिल्या प्रविण पवार (रा. आळंदी म्हातोबाची ता. हवेली जि.पुणे) याने व त्याचे साथीदारांनी केला असल्याचे गोपनीय माहिती यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाला मिळाली. सदर गुन्हयातील आरोपी हे सोने विक्री करिता भांडगाव या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाल्याने यवत गुन्हे शोध पोलीस पथकाने सापळा रचून व वेशांतर करून तीन संशयित इसमांना ताब्यात घेवून घेतले.
या सर्वांची तपासणी केली असता यातील इसम नितीन सुकराज भोसले (रा. सुपा ता. बारामती) याकडे विवो कंपनीचा मोबाईल मिळून आला. सदर मोबाईलबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी सदर मोबाईलबाबत माहिती घेतली असता सदरचा विवो कंपनीचा मोबाईल हा खोर येथे चोरी करण्यात आलेल्या ऐवजापैकी असल्याचे समजले.
सदर संशयित इसमांना सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासकामी ताब्यात घेवून सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा १) रोहित उर्फ पिल्या प्रविण पवार, (रा.आळंदी म्हातोबाची ता. हवेली जि. पुणे) २) नितीन सुकराज भोसले, (वय ३१ वर्षे) ३) रोहित राजेश काळे, (वय २२वर्षे दोघे रा. सुपा ता. बारामती जि.पुणे) यांनी केला असून त्यांचा एक साथीदार नामे ४) आयशाम विलास भोसले (रा. सुपा ता. बारामती जि.पुणे) या सर्वांनी संगणमताने केला असल्याची कबुली दिली. त्यांना सदर गुन्ह्याच्या कामी अटक करण्यात आले असुन पोलीस कस्टडी चौकशी दरम्यान त्यांनी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील इतर १३ घरफोडी, चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली.
सदर आरोपींकडून एकूण १४ गुन्ह्यातील १२० ग्रॅम सोन्याचे दागिने, १५ भार चांदीचे दागिने, ३०,०१७ रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण१२, ३०,०१७ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पंकज देशमुख (पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण) गणेश बिराजदार अपरपोलीस अधिक्षक बारामती, बापुराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड, अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, सपोनि राहूल गावडे (स्था. गु.शा), पो. हवा. संदीपदेवकर, पो.हवा. गुरूनाथ गायकवाड, पो.हवा. अक्षय यादव, पो.हवा. विकास कापरे, पो.हवा. दत्ता काळे,पो.हवा. महेंद्र चांदणे, पो.हवा. रामदास जगताप, सफौ सुभाष शिंदे, सफौ सचिन घाडगे (स्था.गु.शा), पो. हवा. अजित भुजबळ (स्था. गु.शा), पो. हवा. विजय कांचन (स्था.गु.शा), पो.कॉ. धिरज जाधव (स्था.गु.शा), पो.कॉ.मारुती बाराते, पो.कॉ. अमोल भुजबळ, पो. कॉ. मोहन भानवसे यांच्या पथकाने केली आहे.