मुंबई : स्व.मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज चेक करुन विविध ठिकाणी शोध घेत पोलिसांनी आरोपीला आत्ता जेरबंद केले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकेच त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांना सुद्धा शिवसैनिक खूप मानायचे. 1995 साली मीनाताई ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर शिवाजी पार्क परिसरात त्यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता. आज दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी साधारण सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकून विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर शिवसैनिकांमध्ये कमालीचा रोष पहायला मिळाला.
अनेक आमदार, मंत्र्यांनी या ठिकाणी भेट दिली. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनीही या घटनास्थळी जात या घटनेचा निषेध नोंदवला. पोलिसांना या बाबत घटनास्थळाचे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले होते. त्यामध्ये एक व्यक्ती पुतळ्यावर लाल रंग टाकताना दिसत होता. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध सुरु केला होता.
आता या घटनेतील आरोपी उपेंद्र गुणाजी पावसकर याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी केल्यानंतर त्यानेच हे कृत्य केल्याचे कबुल केले आहे. यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.