ऐन दिवाळीत दौंडमधील 21’ चारचाकी ‛गाड्या’ घेऊन ‛ठग’ फरार..! दौंडकरांची करोडो रुपयांची फसवणूक

अख्तर काझी

दौंड : तुमची मोटार कार आय. टी. कंपनीमध्ये लावतो व तुम्हाला दर महा 25 हजार रुपये भाडे देतो असे सांगून खेड (जि. पुणे) तालुक्यातील एका महाठगाने ऐन दिवाळीत दौंड मधील लोकांची 21 वाहने लंपास करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे या वाहन मालकांची झोपच उडाली आहे. फसवणूक झालेल्या येथील सर्व वाहन मालकांनी मिळून या महाठगा विरोधात दौंड पोलिसांकडे तक्रार केली असून राकेश श्याम बाडगी (रा. मोरे वस्ती, दौंड) यांनी फिर्याद दिल्याने दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर मोहन साबळे (रा. साबळेवाडी ता. खेड, जिल्हा पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी राकेश बाडगी यांनी सण 2018 मध्ये आपल्या दैनंदिन कामासाठी मोटार कार (बलेनो, मारुति सुझुकी) घेतली होती. परंतु त्यांचे शेजारी राहणाऱ्या मोरे यांनी आपली कार सागर साबळे याच्याकडे 25 हजार रु प्रति महिना भाडेतत्त्वावर दिली आहे असे समजल्याने त्यांनीही आपली कार याच सागर साबळे याला भाडेतत्त्वावर देऊन करारनामा (10 ऑक्टोबर 2020) करून घेतला. तुमची कार कंपनीत भाडेतत्त्वावर लावतो व तुम्हाला प्रति महिना 25 हजार रुपये देतो असे साबळे याने त्यावेळी सांगितल्याने फिर्यादी यांनी आपली गाडी त्याच्या ताब्यात दिली.

पहिले 4 ते 5 महिने साबळे हा ठरल्याप्रमाणे दर महा 25 हजार रुपये देत होता. मात्र त्यानंतर जुलै 2021 पासून साबळे याचा फोन बंद येऊ लागल्याने फिर्यादी यांनी साबळेने दिलेल्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली असता त्याने फिर्यादिंची गाडी कंपनीला लावलेलीच नाही अशी माहिती त्यांना मिळाली आणि फिर्यादींना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी साबळे याची अधिक चौकशी केली असता दौंड मधील जवळपास 20 ते 25 वाहन मालकांची त्याने अशाच प्रकारची फसवणूक केली असल्याचे त्यांना समजले.

त्यांच्याही गाड्या कंपनीत लावतो म्हणून तो सर्वांचा विश्वास संपादन करून घेऊन गेला आहे व त्यानंतर त्यांच्या कोणाशीही त्याने संपर्क केलेला नाही हे सुद्धा त्यावेळी उघड झाले. भाड्याचे पैसेही नाही व गाडीसुद्धा गायब झाली आहे, अशी फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी व इतर 20 जणांनी दौंड पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दौंड पोलिसांनी सागर साबळे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहा. पो. निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करीत असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली.

सागर साबळे हा ग्रामपंचायत सदस्य असून अशाच प्रकारच्या फसवणुकी प्रकरणी सध्या तो भोसरी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने जवळपास 100 हुन अधिक वाहने विकल्याची चर्चा सध्या दौंड शहरात सुरू आहे.