लालासाहेब शेळके यांचे अपघाती निधन

अब्बास शेख

दौंड : केडगाव येथील प्रसिद्ध व्यापारी, उद्योजक लालासाहेब पंढरीनाथ शेळके यांचे आज दुपारी 2:00 च्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ गावाजवळ अपघाती निधन झाले. ते 55 वर्षांचे होते. दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन शेळके यांचे ते वडील होते.

एका नातेवाईकाच्या लग्नासाठी ते कुरकुंभ या ठिकाणी गेले होते. कुरकुंभवरून परतत असताना त्यांच्या दुचाकी वाहनाला एका चारचाकी वाहणाची पाठीमागून जोरदार धडक बसल्याने ते रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात त्यांना जबर मार लागल्याने ते जागीच गतप्राण झाले अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

लालासाहेब शेळके हे जुन्या काळातील प्रसिद्ध लिंबू आडतदार, व्यापारी होते. कायम हसतमुख आणि मितभाषी स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्यामागे पत्नी, चार विवाहित मुली आणि मुलगा सचिन शेळके असा मोठा परिवार आहे. दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांनी लालासाहेब शेळके यांच्या अपघाती निधनावर दुःख व्यक्त केले आहे.