लोणीकाळभोर : सहकारनामा (हनुमंत चिकणे)
पुणे – सोलापूर महार्गावरील कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (ता. २१ ) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे .
दत्ताराम गोविंद अडागळे (वय- ६३, रा. दातार कॉलनी, उरुळी कांचन, ता.हवेली) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पुतणे अविनाश आत्माराम अडागळे (वय- ३४ रा. दातार कॉलनी, उरुळी कांचन, ता. हवेली ) यांनी लोणी काळभोर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश अडागळे व त्यांचे चुलते हे एकत्रित राहतात. काही दिवसांपासून लोणीकंद ते थेऊर फाटा या रोडचे काम चालू असल्याने त्या रोडवरती मोठी वाहने जाऊ नये म्हणून कालिका सिक्युरिटी या कंपनीला या रोडचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. त्यानुसार दत्ताराम अडागळे हे सिक्युरिटी गार्ड म्हणून संध्याकाळी कामासाठी नेमले होते.
दरम्यान, रविवारी (ता. २१) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सुरक्षारक्षक अधिकारी मोहन प्रेमचंद यांचा अविनाश अडागळे यांना फोन आला की थेऊर फाटा या ठिकाणी तुमचे चुलते दत्ताराम अडागळे हे काम करीत असताना अपघात झाला असून तुम्ही लवकर या. त्यावेळी चुलत भाऊ सिद्धार्थ अडागळे, सनी अडागळे, असे थेऊर फाट्यावर गेले असता तेथे सिक्युरिटीत काम करत असलेले बेनी सवारे यांनी सांगितले की चार वाजण्याच्या सुमारास सोलापूरकडील बाजूने पुणेकडे जाणाऱ्या एका अज्ञात गाडीने गोविंद अडागळे यांना धडक दिली.
या धडकेत दत्ताराम अडागळे रस्त्यावरच कोसळल्यामुळे पुण्याकडे जाणारी इतर वाहने त्यांच्या अंगावरून गेल्यामुळे त्यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला होता. तसेच त्या ठिकाणी एका गाडीची नंबर प्लेट तुटलेल्या अवस्थेत आढळून आली.
पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत.