नाशिक : नाशिक औरंगाबाद रोडवर नाशिकच्या नांदुरनाका येथील मिरची चौकात खासगी बसचा अपघात होऊन यात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार अपघात झाल्यानंतर या बसने अचानक पेट घेतला होता. लागलेल्या आगीने मोठे रौद्ररुप धारण केल्याने यात मोठी जीवित हानी झाली. आग इतकी भयंकर होती की यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत्यांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत जाहीर केली आहे.
चिंतामणी ट्रॅव्हल ची ही खाजगी बस असल्याची माहिती मिळत असून यात इतर 38 प्रवासी जण जखमी झाले आहेत. या जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असून खासगी रुग्णालयातूनही मदतीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अपघाताची चौकशी केली जाईल तर सध्या जखमींना मदत करण्यास प्राधान्य दिले आहे. सर्व उपचार शासनाच्या वतीने केला जाईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले आहे.
असा झाला अपघात..!
नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी ट्रक आणि बसमध्ये हा भीषण अपघात घडला आहे. ही बस यवतमाळहून मुंबईकडे जात होती मात्र, वाटेतच बस चा अपघात होऊन बसला आग लागून या आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
हा अपघात आज पहाटे 5 वाजून 15 मिनिटांच्या आसपास हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल होऊन मदत कार्य झालं होतं.