उसाच्या ट्रेलरने घेतला SRPF जवानाचा जीव! दौंडमधील धक्कादायक घटना

दौंड : दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड-बेळगाव राज्य महामार्गावरील मसोबा मंदिर परिसरात झालेल्या अपघातामध्ये येथील राज्य राखीव पोलीस दलातील (गट क्र. 7) जवानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. भारत अजिनाथ भोई(वय 31,रा. राज्य राखीव पोलीस वसाहत, मुळ रा. पळसदेव,ता. इंदापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार भारत भोई हे राज्य राखीव पोलिस दलातील गट क्रमांक 7 मध्ये कार्यरत होते. आपल्या कार्यालयातून ते घरी जात असताना येथील म्हसोबा मंदिर समोरील रस्त्यावरून जाणाऱ्या ऊस वाहतुकीच्या ट्रॉली खाली त्यांची दुचाकी गेली, ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने जवानाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची खबर मिळताच दौंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेतली. अपघातातील जवानाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला असून सदर अपघाताची नोंद केली आहे. अपघाता मधील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला दोन ट्रॉली लावलेल्या होत्या, ट्रॅक्टरला दोन ट्रॉली लावून वाहतूक करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, ट्रॅक्टर चालकाला त्यामुळे मागील येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळेच अशा बेकायदेशीर वाहतुकीमुळे अपघात होतात असे स्थानिकांचे म्हणणे आहे.