अख्तर काझी
दौंड : बदलापूर येथील लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात शहरात आंदोलने चालू असतानाच येथील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरण करण्यात आलेली मुलगी, शहरात एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची असल्याची माहिती मिळत आहे.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली असून दौंड पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती ठाणे अंमलदार रोटे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.21 ऑगस्ट रोजी दुपारी 1:00 च्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी पेन आणण्यासाठी घरातून बाहेर पडली. बराच वेळ झाला मुलगी घरी न आल्याने, फिर्यादी यांनी दुपारी 2.30 वाजण्याच्या दरम्यान आपल्या पतीस, मुलगी पेन आणाण्यास बाहेर गेली होती परंतु अद्याप ती परत आलेली नाही असे कळविले व तुम्ही लवकर घरी या असे सांगितले. त्यामुळे फिर्यादी यांचे पती जोगीराम तत्काळ घरी आले.
दोघांनीही येथील सरपंच वस्ती, रेल्वे स्टेशन तसेच परिसरात मुलीचा शोध घेतला. आपल्या नातेवाईकांना फोन करून तसेच त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता मुलीची कोणतीच माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आपल्या मुलीचे अपहरण केले असल्याची खात्री पटल्याने त्यांनी पोलिसात तक्रार केली आहे. पुढील तपास दौंड पोलिस करत आहेत.