पुणे : महिला पोलीस कर्मचाऱ्याशी लॉकडाऊन काळात ओळख वाढवून तिला कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीचे औषध देऊन एका पोलीस शिपायाने महिला पोलीस कर्मचार्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत संबंधित पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार करतानाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत या महिला पोलिसावर सातत्याने बलात्कार केला असल्याचेही फिर्यादित म्ह्टले आहे. याची वाच्यता कुठे करू नये म्हणून या पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलिसाला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही म्हटले आहे.
याप्रकरणी खडक पोलिसांनी दीपक सिताराम मोघे या पोलीस शिपायावर गुन्हा दाखल केला असून मोघे हा सध्या मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहे. त्याच्यावर महिला पोलीस कर्मचार्याच्या फिर्यादीवरून खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेली घटना ही स्वारगेट पोलीस वसाहत तसेच खडकवासला येथील लॉजवर २०२० ते १ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही शहर पोलीस दलात नेमणूकीला असून स्वारगेट पोलीस वसाहतीत राहतात. लॉकडाऊनच्या कालावधीत आरोपी दीपक मोघे याने फिर्यादी महिला पोलिसाशी ओळख वाढविली. या काळात तो तिच्या घरी जेवणास जात होता. त्या दरम्यान त्याने कोल्ड्रींकमधून फिर्यादीला गुंगीकारक औषध दिले. त्यामुळे फिर्यादीस उलट्यांचा त्रास होऊ लागला. तेव्हा त्याने फिर्यादीला गोळ्या खाण्यास दिल्या. त्यामुळे आणखी गुंगी येऊन त्यांना झोप लागली. तेव्हा त्याने फिर्यादीवर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ तयार करत हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तो या महिला पोलिसावर अत्याचार करत राहिला.