बारामती : बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये अत्यंत भिषण असा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचे मुंडके धडापासून वेगळे झाले होते तर जी कार या दुचाकीवर आदळली त्या कार चालकाच्या शरीराचे अक्षरशा दोन भाग झाले होते. ही घटना संत तुकाराममहाराज पालखी महामर्गावरील उंडवडी सुपे हद्दीत असणाऱ्या शिर्सुफळ फाट्यावर रात्रीच्या सुमारास घडली आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १०:३० च्या सुमारास अमित लक्ष्मण लगड (वय ३९ रा. गोपाळवाडी भोईटेनगर ता दौंड) हे आपल्याकडील टाटा टिगोर या गाडीने पालखी महामार्गावरून दौंडकडून बारामतीच्या दिशेने निघाले होते. यावेळी भरधाव वेगाने असणाऱ्या कारवरील त्यांचा ताबा सुटल्याने ही कार दुभाजक ओलांडून दुस-या बाजूने होंडा युनिकॉर्नवरून जात असलेल्या विशाल रामचंद्र कोकरे (वय 34 वर्षे, रा धुमाळवाडी पणदरे ता. बारामती) यांच्या गाडीवर जाऊन आदळली.
हा अपघात इतका भयानक होता की ही दुचाकी कार ची समोरील काच फोडून आत घुसली आणि हा अपघात होताना दुचाकीस्वाराचे मुंडके अक्षरशा उडून दुसऱ्या बाजूला जाऊन पडले तर अपघातानंतर या कार ने तीन ते चार पलट्या खाल्ल्याने यातील कार चालकाच्या शरीराचे दोन भाग होऊन या अपघातात दुचाकी आणि चारचाकी चालक हे जागीच ठार झाले.
या अपघाताची माहिती मिळताच सुपे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत यातील मृतांना तातडीने रुग्णालयात हलवत अपघाती वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जिनेश कोळी हे करीत आहेत.